Pimpri: वायसीएमएच वाहनतळासाठीच्या 8 कोटींच्या वाढीव खर्चाला स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन अकरा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या पहिल्या चार मजल्यावर वाहनतळ करण्याचे नियोजन असताना आता तळमजल्यावरही अतिरिक्त वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीव कामासाठी येणाऱ्या आठ कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वाहनतळाच्या आवारात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन बहूउद्देशीय अकरा मजली इमारत बांधण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये तळमजल्यावर सर्वसाधारण उपाहारगृह, रात्र निवारा, पहिला ते चौथा मजल्यावर चार चाकी वाहनतळ, पाचवा मजला सर्व्हिस फ्लोअर, सहावा मजला डॉक्टरांसाठी उपाहार गृह, सातवा मजला ग्रंथालय, आठवा मजला ते दहावा मजला विद्यार्थी वसतिगृह, अकराव्या मजल्यावर बहूउद्देशीय सभागृह आणि इमारतीवरील पाच लक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. यासाठी स्थापत्य व विद्युत असा एकत्रित खर्च 45 कोटी 58 लाख 97 हजार रूपये इतका अपेक्षित होता.

या कामासाठी शशी प्रभू असोसिएट्स यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. लाखो रुपये त्यांना शुल्कापोटी देण्यात आले असून त्यांनी तांत्रिक अहवालाप्रमाणे या ठिकाणी नैसर्गिक खडक असल्याने त्याप्रमाणे नकाशे, आरसीसी डिझाईन आणि अर्थसंकल्प तयार केला. इमारतीच्या आराखड्याप्रमाणे ‘इसोलेटेड पुटींग’चे नियोजन करण्यात आले. परंतु, प्रत्यक्ष खोदाई करताना मोठे खडक लागले. त्यामुळे या ठिकाणी ए विंगसाठी पाच मीटरपर्यंत आणि बी विंगसाठी साडेपाच मीटरपर्यंत खोदाई करावी लागली आहे. सध्या या कामाअंतर्गत इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत पाच मीटर ते 5.50 मीटर खोलीच्या खोदाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

आता इमारतीच्या तळमजल्यावरही अतिरिक्त वाहनतळ करण्याचा सल्ला प्रकल्प सल्लागाराने दिला आहे. त्यामुळे पाच मीटर ते 5.50  मीटर खोलीच्या खोदाईचा खर्च पूर्ण पाण्यात जाणार आहे. या विषयावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत 24 ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. कामाचे सल्लागार शशी प्रभू असोसिएट्स यांनी सुमारे 1250 चौरसमीटर अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होणार असल्याची माहिती बैठकीत दिली. या वाहनतळामुळे रूग्णालय आवारातील वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे दावाही त्यांनी केला. त्यानुसार, अतिरिक्त वाहनतळ करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली.

या कामासाठी आता पुन्हा प्रकल्प सल्लागार शशी प्रभू असोसिएट्स यांच्यामार्फत वाढीव वाहनतळाचे सुधारीत नकाशे तयार करून सुधारीत बांधकाम परवानगी घेण्यात येणार आहे. या कामाच्या सुधारीत अंदाजपत्रकानुसार स्थापत्य विषयक वाढीव तळमजल्याच्या कामासाठी 10  कोटी 39 लाख रूपये इतका अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यामुळे कामाच्या अंदाजपत्रकात 10 कोटी 39 लाख रूपये इतकी वाढ अपेक्षित धरण्यात आली. कामाच्या वाढीव खर्चाच्या रकमेस 20 नोव्हेंबर 2019 रोजीच्या महापालिका सभेत 59 कोटी रुपये सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

या कामाची मूळ निविदा 30 कोटी 66 लाख 71 हजार रुपये इतकी आहे. हे काम एस. एस. साठे यांना देण्यात आले आहे. सद्यस्थितीत पाच मीटर ते 5.50  मीटर खोलीच्या खोदाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाअंतर्गत अतिरिक्त तळमजल्याचे काम ठेकेदार एस. एस. साठे हे निविदा मंजूर दराने करण्यास तयार आहेत. त्यांना निविदा दराच्या 4.50  टक्के जादा दराने काम देण्यात आले आहे. त्यानुसार, तळमजल्याच्या सुधारीत वाढीव कामासाठी 7 कोटी 81 लाख रुपये खर्च होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.