Pimpri: शहरवासियांनो, पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा द्या; राष्ट्रवादीचे आवाहन

एमपीसी न्यूज – अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक पेन, एक वही देण्यात यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी-चिंचवडकरांना करण्यात आले आहे.

कोल्हापूर, सांगलीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज आहे. त्यामुळे शालेय साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. आपल्या शहराचे एक कर्तव्य म्हणून आपल्याकडून पूरग्रस्तांना शैक्षणिक मदत मिळावी. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने एक पेन, एक वही द्यावा, असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले. यापूर्वी जनावरांचा चारा, अन्नधान्य, पाणी, कपडे, प्राथमिक उपचारासाठी लागणारे औषधे आदी वस्तू आम्ही स्वत:जाऊन पूरग्रस्त बांधवांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, सेल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी बुके, हार-फुले न आणता किंवा कोणतेही फ्लेक्स, पोस्टर न लावता शैक्षणिक वस्तू वह्या, पेन देण्याचा संकल्प करण्याचे योजिले आहे. शैक्षणिक वस्तू ह्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवक्ते फजल शेख पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.