Pimpri: ‘प्रभागातील गरजू नागरिकांना धान्य वाटपासाठी नगरसेवकांना पाच लाख रुपये द्या’

महापौर, सभागृह नेत्यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असून औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांचा रोजगार हिरावला आहे. रेशनकार्ड नसल्याने त्यांना शिधा मिळत नाही. त्यामुळे हातावर पोट असणारे गरीब नागरिक मदतीसाठी नगरसेवकांकडे येत आहेत. त्यामुळे प्रभागातील गरजू नागरिकांना धान्य वाटण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला पाच लाख रुपये द्यावेत, अशी सूचना महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आयुक्तांना केली आहे.

महापौर ढोरे आणि सभागृह नेते ढाके, माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (शनिवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. गरजू नागरिकांना अन्नधान्य देण्यासाठी आणि ते खरेदी करण्याकरिता पाच लाख रुपये द्यावेत. त्याबाबतचा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेत मंजूर करुन घ्यावा, अशा सूचना आयुक्तांना दिल्या.

 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे औद्योगिकनगरीतील कष्टकरी कामगार, सर्वसामान्य नागरिकांचे अन्नधान्याविना हाल होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मोफत धान्य वाटप करणे आवश्यक आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना रेशन दुकानावर धान्य मिळत आहे. तथापि, अनेकांकडे रेशनकार्ड नाही. वितरणातील अडचणीमुळे अनेक नागरिकांना एकवेळचे अन्न मिळण्यातही अडचणी येत आहेत. गरीब, हातावर पोट असणारे नागरिक मदतीसाठी नगरसेवकांकडे येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागातील गरजूंना धान्य वाटप करण्यासाठी आणि ते खरेदी करण्याकरिता पाच लाख रुपये द्यावेत, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. नामदेव ढाके : सभागृह नेते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.