Pimpri News: पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे नाव द्या – प्रकाश जवळकर

give Name the late corporator Javed Sheikh to Municipalty Project - Prakash Jawalkar

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी शेवटपर्यंत जनतेसाठी कार्य केले. कोरोना कालावधीत देखील त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत रहावी, यासाठी आकुर्डी भागात होणा-या पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत नगरसेवक शेख यांचे नाव देण्याची मागणी भाजपचे शहर माजी सरचिटणीस प्रकाश जवळकर यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या आकुर्डी-काळभोरनगर प्रभागाचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे 31 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले. शेख कार्यक्षम नगरसेवक होते.

कोरोना कालावधीत त्यांनी गरजूंना धान्य वाटप केले. संपूर्ण प्रभागामध्ये जंतूनाशक फवारणी समक्ष उभे राहून करुन घेतली. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांना,कोरोना बाधित रुग्णांना, कुटुंबाना मदत केली.

नागरिकांची सेवा करत असतानाच त्यांना कोरोनाने कवटाळले ते कायमचे. प्रभागामध्ये ते मतदारांचे अत्यंत लोकप्रिय आणि लाडके नगरसेवक होते असे तेथील स्थानिक नागरिक, मतदार सांगतात. म्हणून तर ते तीन वेळा त्या प्रभागातून निवडून आले आहेत.

तीन वेळा एखाद्या प्रभागातून निवडून येणे सोपी गोष्ट नाही. तसेच त्यांना पालिकेमध्ये महत्त्वाचे पदही मिळाले नाही. त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत रहावी. यासाठी आकुर्डी भागात होणा-या प्रकल्पाला दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे नाव देण्यात यावे.

मी भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहराचा पदाधिकारी होतो. तरीही, मी राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाचे नाव देण्याची शिफारस का करतोय, असा प्रश्न बहुतेकांना पडला असेल. पण, भारतीय जनता पक्ष जात-पात तसेच विधायक कामासाठी पक्षीय भेद न मानणारा आमचा पक्ष आहे.

महापौरांनी गांभीर्याने लक्ष देऊन दिवंगत नगरसेवक शेख यांचे नाव आकुर्डीतील विकासकामाला देऊन त्यांचा उचित असा गौरव करावा, अशी विनंती जवळकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.