Pimpri: स्थायी समितीचे सभापतीपद संतोष लोंढे यांना द्या; भोसरीच्या नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे तिस-या वर्षीचे सभापती पद भोसरीचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना देण्यात यावे. भोसरीतील समाविष्ट गावाला दोन वर्ष महापौरपद मिळाले. तर, पहिले दोन वर्ष स्थायी समिती चिंचवड मतदारसंघाकडे होती; मात्र भोसरी शहरात कोणतेही मोठे पद मिळाले नाही. त्यामुळे आगामी स्थायी समितीचे सभापतीपद नगरसेवक संतोष लोंढे यांना देण्यात यावी, अशी मागणी भोसरीच्या सर्व नगरसेवकांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत केली.

महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, ‘इ’ प्रभागाच्या सभापती भीमाबाई फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नितीन लांडगे, सागर गवळी उपस्थित होते.

  • यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर दोनवर्ष महापौरपद समाविष्ट गावाला मिळाले. तर, दोनवेळा स्थायी समितीचे सभापतीपद चिंचवड मतदारसंघाकडे होते. भोसरीत एकही मोठे पद मिळाले नाही. त्यासाठी तिस-या वेळेसचे स्थायी समिती सभापतीपद ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना देण्यात यावे. भोसरीकडेच स्थायी समिती सभापतीपद मिळावे, यासाठी आम्ही आमदार महेश लांडगे यांच्याकडे आग्रह करणार आहोत.

त्याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना भेटून भोसरीलाच स्थायी समिती द्यावी, अशी विनंती करणार आहोत. राज्यसभेचे खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची देखील भेट घेणार असल्याचे, महापौर जाधव यांनी सांगितले. पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. पक्षाच्या निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.