BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘तुकोबाची भक्ती दे, अंगी सहनशक्ती दे…’कवयित्री शोभा दामोदर जोशी यांचा सन्मान, ‘शब्दधन’चा उपक्रम

एमपीसी न्यूज – “तुकोबाची भक्ती दे, अंगी सहनशक्ती दे.. मनी भोळा भाव दे, अखेरच्या श्वासापर्यंत मुखी तुझे नाम दे…” ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांची ही भक्तिपूर्ण रचना संत तुकारामांचे अध्यात्म सांगून जाते. त्यांच्या आजवरील कवितेच्या प्रवासाचा यथोचित सन्मान शब्दधन काव्यमंचाने गुरुवारी (दि. ११ जुलै)ला केला. निमित्त होते थेरगाव – हिंजवडी रोड येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित *”चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी”* या उपक्रमाचे. साहित्यसंवाद, काव्यवाचन, कवितांचे रसग्रहण अशी ही मैफल रंगली.

‘शब्दधन’ काव्यमंचच्या सल्लागार अँड.अंतरा देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कवी देवेंद्र गावंडे यांनी, ” सुखके सब साथी, दुखमे ना कोई” या महंमद रफी यांच्या भक्तिगीताने केली. याप्रसंगी प्रा.तुकाराम पाटील, निशिकांत गुमास्ते, आय के शेख, मधुश्री ओव्हाळ, शोभा शरद जोशी, प्रदीप गांधलीकर, शामराव सरकाळे, नेत्रावती अंबुरे, आनंद मुळूक आदी मान्यवर उपस्थित होते.

  • “माया ममतेची कुपी जणू सुखाची घटका, भोग भोगल्यावाचून नाही इथून सुटका” आणि “आकाशाची निळाई दे, सागराची गहराई दे” या कवयित्री शोभा जोशी यांच्या कवितांचे रसग्रहण पियानो वाजवून आणि सुरेल आवाजात गाऊन कवी तानाजी एकोंडे यांनी केले.

‘दूर्वांकुर’ , ‘चिमणखोपा’ , ‘सुखाने भागता दु:खाला’ हे आहेत कवयित्री शोभा जोशी यांचे काव्यसंग्रह. अंतरा देशपांडे म्हणाल्या, “संत तुकारामाची विचारधारा जपत आपली कविता जोखंडाच्या वारुळातून बाहेर पडून कात टाकलेल्या नागासारखी ढोंगी व्यवस्थेवर फुत्कारली पाहिजे!”

  • प्रास्ताविक शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले. जयश्री गुमास्ते, शरद काणेकर, भालचंद्र जोशी, वैशाली जोशी, भाऊसाहेब गायकवाड, राजाराम लोंढे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. कवयित्रीचा परिचय आणि सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी केले तर आभार फुलवती जगताप यांनी मानले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3