Birthday Special : क्रिकेटचा देव! जेंटलमन्स गेममधील सर्वात ‘जेंटलमन’ खेळाडू सचिन तेंडुलकर!

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – सचिन मैदानात उतरला की ‘सचिन’ ‘सचिन’ या एका सुरातील आवाजाच्या आरोळ्यांनी मैदान दुमदुमून जायचे. सचिन जोवर खेळत आहे तोवर प्रत्येक भारतीय श्वास रोखून सामना पाहत असासचा आणि तो जर आऊट झाला तर टीव्ही बंद केला जायचा, असा अफाट गुणी, शांत, ज्यांचा श्र्वास आणि ध्यास फक्त क्रिकेट आहे जो क्रिकेट विश्वात क्रिकेटचा देव म्हणून नावारूपास आलेला सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे.

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळी बरोबर ‘हॅरीस शील्ड’ सामन्यात 664 धावांची अजस्र भागीदारी रचली. 1988 – 1989 साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 100 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय 15 वर्षे होते, आणि त्यावेळी पहिल्या सामन्यात शतकी खेळी करण्याचा विक्रम करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

वयाच्या 14 व्या वर्षापासूनच रणजी सामने खेळणाऱ्या सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात 1989 साली पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्याने केली. पदार्पणात सचिन तेंडुलकर चांगली कामगिरी करू शकला नाही. न्यूझीलंड दौऱ्यात पहिले कसोटी शतक बारा धावांनी हुकल्यानंतर 1990 साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1994 मध्ये पहिले शतक झळकावले. वयाची 20 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतक झळकावणारा सचिन हा एकमेव तरूण क्रिकेटर असून हा आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावाने नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सचिन तेंडुलकर यांचे नाव आदराने घेतले जाते. चोवीस वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 54.08 च्या स्ट्राईक रेटने 15921 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 86.24 च्या स्ट्राईक रेटने 18426

धावा केल्या आहेत, एकूण 34357 धावा. सचिनने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात मिळून 100 शतके, 164 अर्धशतके तर 6 द्विशतके ठोकली आहेत. 76 वेळा सामनावीर, 20 वेळा मालिकावीर बनण्याचा बहुमान त्याला मिळाला आहे. सचिनच्या नावावर‌ 201 विकेट आणि 256 कॅचची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 2000 धावा करणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे तर 50 पेक्षा जास्त वेळा सामनावीर ठरलेला सुद्धा सचिन हा एकमेव फलंदाज असून हे दोन्ही विक्रम सुद्धा त्याच्या नावे आहेत.

आंतरराष्ट्रीय 20-20 क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सचिन तेंडुलकर जास्त रमला नाही तरी मुंबई इंडियन्स आयपीएल टीमकडून खेळताना त्याने 78 सामने खेळत 119.82 च्या स्ट्राईक रेटने 2334 धावा आपल्या नावे नोंदवल्या तर एक शतक झळकावले आहे. सचिन सध्या मुंबई इंडियन्स आयपीएल टीमसाठी मेंटाॅर म्हणून काम करतो.

सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची  नोंद आहे.सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम (51), सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम (52), कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करण्याचा विक्रम, सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम (463), एकदिवसीय सामने सर्वाधिक (89 वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (49) आणि 14,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करण्याचा विक्रम, 1998 साली त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या होत्या हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. विक्रमांची यादी बरीच मोठी आहे. थोडक्यात सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील गुणी आणि तितकाच शिस्तप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो.

सचिनने क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल  त्याला भारत सरकारच्या विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या वतीने त्याला 1994 साली अर्जुन क्रिकेट पुरस्कार, 1997 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 1999 पद्मश्री पुरस्कार, 2008 पद्मविभूषण आणि 2014 साली त्याला भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्याला देण्यात आले आहेत. 2017 साली ‘सचिन अ बिलियन ड्रिम्स’ नावाची सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीवर आधारित फिल्म‌ सुद्धा आली होती.

16 मार्च 2012 रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके पूर्ण केली. शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला 1 वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने नोव्हेंबर 14, 2013 रोजी आपला 200 वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने 74 धावा करत शेवटची खेळी खेळली, हा सामना भारताने जिंकला होता. आपले निवृत्तीचे भाषण करताना त्याच्यासह सर्व देश रडत होता आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ‘सचिन’ ‘सचिन’ या नावाची आरोळी पुन्हा दुमदुमत होती त्यावेळी सचिन म्हणाला होता की, हा आवाज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कानात घुमत राहील.

सचिनचे भारतासाठी आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप जिंकायचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वर्ल्डकप जिंकायचे त्याचे स्वप्न 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये पूर्ण झाले. श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेत मैदानातून मिरवणूक काढून अनोखी मानवंदना दिली होती. तर युवराज सिंग, गौतम गंभीर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, झहीर खान यासह  सर्वच खेळाडूंनी हा वर्ल्डकप आपल्याला सचिनसाठी जिंकायचा होता, अशी भावना व्यक्त केली होती.

सचिन म्हणजे भारतीयांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिन जोवर क्रिजवर असायचा तोपर्यंत प्रत्येक सामना आपण जिंकूच, अशी भावना प्रत्येक भारतीयाची असायची. अटीतटीच्या कित्येक सामन्यांवेळी सचिनसाठी प्रार्थना, उपवास आणि जप अशा गोष्टी केल्या जात होत्या. क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी क्रिकेटवर निस्सीम प्रेम करायला शिकवणाऱ्या आणि 24 वर्षे क्रिकेटच्या माध्यमातून मनमुराद आनंद देणाऱ्या क्रिकेटच्या देवाला ‘एमपीसी न्यूज’ तर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.