Pimpri: उद्योजकांसाठी खुशखबर; औद्योगिकनगरीतील खडखडाट सुरु होणार, उद्योग सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी

State govt finally allows Industry to start in Pimpri Chinchwad except in Containment zones after almost 2 months of lockdown

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने आज (गुरुवारी) परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे 42 दिवसानंतर औद्योगिकनगरीतील खडखडाट सुरु होणार आहे.  शहरातील आणि फक्त 33 टक्केच कामगार कामावर असणे बंधनकारक आहे.  

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत टाटा मोटर्स, बजाज, महिंद्रा या मोठ्या कंपन्यांसह एमआयडीसीतील लघुउद्योग काम करतात. सुमारे 11 हजार सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि कारखाने आहेत. लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून हे उद्योग बंद होते. त्यामुळे उद्योजक अडचणीत आले होते. सरकारकडे उद्योग सुरु करण्याची मागणी  लावून धरली होती.

अखेर राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग सुरु करण्यास आज परवानगी दिली आहे. कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी शहरातील रहिवासी असलेले कामगार असावेत. 33 टक्केच कामगारांची हजेरी असावी. कंपनीची बस  अथवा त्यांच्या चारचाकी वाहनातूनच कामगारांनी प्रवास करायचा आहे.

कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु करण्यास परवानगी – आयुक्त

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीत उद्योग सुरु करायचे आहेत.  त्यामध्ये काही अटी-शर्ती आहेत. त्यानुसार उद्या त्याचे आदेश काढले जातील. कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु केले जातील. केवळ शहरातीलच कामगार असतील. शहराबाहेरील कामगार येणार नाहीत. त्यांना कंपनीची बस किंवा खासगी चारचाकी गाडीतून जावे लागणार आहे. दुचाकीवरुन कोणीही जा-ये करु शकणार नाही.

महापालिकेने आम्हाला परवानगीच्या खेळामध्ये आडकवू नये – बेलसरे

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, उद्योग सुरु करण्यासाठी सातत्याने  पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे. खासकरुन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानतो. हा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. आता महापालिकेने आम्हाला परवानगीच्या खेळामध्ये आडकवू नये. आहे त्या कामगारांवर आम्ही उद्योग सुरु करु आणि कोरोनासोबत लढू, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारचे आभार – बाबर

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड मधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. उद्योग हे 33% क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे  विशेष आभार मानतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.