Pimpri: आनंदाची बातमी; बारावा रुग्णही ‘निगेटीव्ह’

पहिले रिपोर्ट निगेटीव्ह, दुसरे रिपोर्ट आल्यानंतर शनिवारी सोडणार घरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 12 व्या रुग्णांचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. हा रुग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. दुस-या तपासणीचे रिपोर्ट उद्या निगेटीव्ह आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील संपुर्ण 12 ही रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत होतील. यामुळे शहरात आता केवळ दिल्लीतून आलेले दोन कोरोनाग्रस्त रुग्ण राहतील.

हा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आला होता. 19 मार्च रोजी हा रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट आज (शुक्रवारी) निगेटीव्ह आले आहेत. दुसरे रिपोर्ट उद्या आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे.  यामुळे शहरातील पहिले बाराही रुग्ण कोरोनामुक्त होतील.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते.  त्यानंतर लागोपाठा बारा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिले तीन रुग्ण 27 मार्च रोजी  ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. तर,  28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि 2 एप्रिल रोजी एक असे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.  त्यानंतर पहिल्या बारापैकी शेवटच्या रुग्णांचे पहिले रिपोर्ट देखील निगेटीव्ह आले होते. उद्या दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 20 मार्च रोजी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर सलग 12 दिवस शहरातही एकही नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे  शहर कोरोनामुक्त होत असल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु, दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात आता केवळ हे दोन कोरोनाग्रस्त रुग्ण  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.