Pimpri: सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले- भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर पोहोचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याची आणि राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवड शहर भाजपने सरकारचा निषेध केला आहे.

तसेच राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही शहर भाजपने केली आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी  अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन दिले आहे. यावेळी शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, “देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोरोनाविरोधात संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक एकवर पोहोचलेला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचे या सर्व गोष्टींकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याचमुळे आज महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या जनतेची दयनीय अवस्था झालेली आहे.

राज्यामध्ये प्रशासन नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही अशी भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. किंबहुना महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वार्‍यावर सोडले आहे, अशीही लोकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे.

कोरोनाविरोधात केंद्र सरकारने गाईडलाईन्स आखून दिल्या, त्यासंदर्भात ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांसाठी पुढचे पाऊल उचलण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णतः अपयशी ठरले आहे.

पीपीई किट, हॉस्पिटलची निर्मिती, राज्यातील सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून एक चांगले नेतृत्व देऊन कोरोना विरोधात लढण्याकरिता बळ देणे अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचे नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर अपयशी झालेले आहे.

स्थलांतरित मजुरांची अवस्था या सरकारने इतकी वाईट करून ठेवली की लाखो मजूर राज्यातून आपापल्या गावी चालत जाण्याकरता निघाल्याचे करुण, हृदय विदारक चित्र आज उभ राहिले आहे. त्याचबरोबर राज्याच्या अंतर्गत जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता कुठल्याही प्रकारची सोय राज्य सरकारने गेल्या तीन महिन्यात केली नाही.

किंबहुना या अडकलेल्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरिता म्हणून की काय राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी दहा हजार एसटीच्या माध्यमातून या सर्व लोकांना मोफत प्रवास करून देऊ अशी फसवी घोषणा केली व लोकांच्या हालाला पारावार उरला नाही.

वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणार्‍या या  सरकारने  दारू दुकाने उघडण्याकरिता विलक्षण तत्परता दाखवली. राज्याच्या मंत्र्यांमध्ये  व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही असे चित्र वारंवार समोर येत आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सरकारवर या सर्वच बाबतीत कठोर टीका केलेली आहे. राज्यकर्ते स्वतःच्या भांडणांमध्ये आणि स्वतःच्या स्वार्थामध्ये मग्न असल्याचे चित्र आज महाराष्ट्राचे आहे.

या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करतो आणि कोरोनाबाबत तातडीने पावले उचलून याला अटकाव करावा व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरीता आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.