Pimpri: गोविंद घोळवे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठवाडा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसभा मतदार संघातबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी विधानपरिषदेचे आमदार व शिवसेनेचे उपनेते डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, आमदार तानाजी सावंत यांनी ‘मातोश्री’ वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड तसेच सोलापूर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय परिस्थितीवर या तिघांमध्ये सुमारे अर्धातासाहून अधिक काळ चर्चा झाली.

मराठवाड्यात शिवसेनाला अनुकूल वातावरण आहे. पक्ष संघटना वाढीला मोठा वाव आहे. कार्यकर्त्यांचे जाळे आहे. नेतृत्वाने ताकद दिल्यास उस्मानाबादसह बीड लोकसभा मतदार संघात देखील शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ शकतो. तसेच मराठवाड्यातून शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढू शकते, अशी सविस्तर माहिती घोळवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.