Pimpri : ‘महायुती म्हणून जनतेने कौल दिला, जनमताचा आदर करुन एकत्र येऊन सरकार स्थापन करा’

अ. भा. ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला महायुती म्हणून मतदान केले आहे. दोन्ही पक्षांना मिळून सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडावी. जनमताचा आदर करत दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लवकर सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवड्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. महायुती करुन निवडणूक लढलेल्या भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. परंतु, शिवसेनेने पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत तिढा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेचे आवाहन केले आहे. जनतेने भाजप-शिवसेनेला महायुती म्हणून मतदान केले आहे. महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत दिले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे अशी जनतेची मागणी आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर अडून बसू नये. शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडावी. महायुतीच्या धर्माचे पालन करत सरकार स्थापन करावे. जनतेला पश्चाताप होईल, तिचा भ्रमनिरास होईल अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेऊ नये. दोन्ही राजकीय पक्षांनी एक पाऊल मागे येऊन चर्चा करावी आणि एकत्रितपणे सरकार स्थापन करावे, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर युती तोडणे किंवा सत्तेसाठी वेगळ्याच पक्षाबरोबर घरोबा करणे, ही मतदारांशी केलेली प्रतारणा तसेच राजकीय व्यभिचार ठरेल आणि आम्ही मतदार तो कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा डॉ. कुलकर्णी यांनी दिला आहे.

दोन्ही पक्षांमध्ये एवढीच खुमखुमी असेल तर विधानसभा बरखास्त करा आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवावी. स्वबळावर बहुमत मिळवावे आणि खुशाल हवे त्याला मुख्यमंत्री करावे, असा टोलाही डॉ. कुलकर्णी यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.