Pimpri : निबंध, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतीवीर चापेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमांतून मतदानाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरिकाला दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मतदान हा संदेश देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन प्राथमिक व माध्‍यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांनी केले. या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते ९ वीचे विदयार्थी, प्राथमिक व माध्‍यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्‍थित होते.

  • इयत्ता ६ वी च्या सक्षम मागाडे, यशराज पाटील यांनी बुध्‍दवंदना म्‍हटली. त्यानंतर विदयार्थ्यांनी आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्‍यांचे कार्य याविषयी माहिती आपल्या मनोगतातून व्‍यक्‍त केली. काही विदयार्थ्यांनी त्‍यांच्‍यावर रचलेली गीते सुरेल आवाजात सादर केली. माध्‍यमिक विभागाचे प्रभारी मुख्‍याध्‍यापक देवीकर यांनी आपल्‍या मनोगतातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्‍ताविक कु.मीना जाधव यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक ११ एप्रिल रोजी इ.५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व इ.५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे मतदानाद्वारे झालेली निवडणूक. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकाला दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार तसेच मतदानाविषयी जागरुकता हे विषय इ. 9 च्या विद्यार्थ्यांनी चित्राच्या माध्यमातून करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खर्‍या अर्थाने अभिवादन केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.