Pimpri : केंद्र शासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ची गुढीपाडव्याला परीक्षा

हिंदु संघटनांकडून निषेध आणि विद्यालय प्रशासनावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या अखत्यारित असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता सहावीसाठीची प्रवेश परीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदू नववर्षारंभी ठेवली आहे. याचा हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे. या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन काणकोण, गोवा येथील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अनिमेश पाल यांनाही देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांसाठी महत्त्वाचा सण आणि हिंदु नववर्षारंभ दिन आहे,असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. या दिवसाला आध्यात्मिकच नव्हे, तर नैसर्गिक आणि ऐतिहासिकही महत्त्व आहे. या दिवशी कोट्यवधी हिंदू गुढी उभारून त्याचे पूजन करतात. देशभरात हिंदु नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले जाते. याच दिवशी प्रवेश परीक्षा असल्याने हिंदु विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या दिवसाचा लाभ घेता येत नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचे कार्य देशातील ३४ राज्यांत असून या विद्यालयांत शिकणारे आणि प्रवेश घेणारे सहस्त्रो विद्यार्थी हिंदू आहेत. अशाप्रकारे इतर धार्मिक सणांच्या दिवशी अशी परीक्षा ठेवली असती का? असा प्रश्‍नही समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांनी उपस्थित केला आहे.

सणाच्या दिवशी अशा प्रवेश परीक्षा ठेवल्याने हिंदू विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल आणि अन्य धर्मीय मुलांना सहज प्रवेश मिळेल, हा हेतू यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विद्यालय प्रशासनाने ६ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवलेली प्रवेश परीक्षा तात्काळ रहित करून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि हा निर्णय घेणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गोवा येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे गोविंद लोलयेकर, नववर्ष स्वागत समिती पैंगीणचे काशिनाथ वझे, मारुती मंदिर चावडीचे अध्यक्ष श्रीकृष्ण देसाई उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.