Pimpri: शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या फलकांवर नातू पार्थ यांची छबी ; मावळातून लोकसभा लढविण्याच्या चर्चेला उधाण

मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ करणार राजकारणाचा श्री गणेशा ?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात लागलेल्या फलकांवर पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची पहिल्यांदाच छबी झळकली आहे. पक्षाने पार्थ यांना ‘प्रमोट’ करण्यास सुरुवात केल्याने पार्थ मावळातून लोकसभा लढविणार असलेल्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. वडील अजित पवार यांच्याप्रमाणेच पार्थ लोकसभेपासून राजकारणाचा श्री गणेशा करणार का ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पवारांची तिसरी पिढी पिंपरी-चिंचवड शहरातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे फलक पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लागले आहेत. या फलकांवर पहिल्यांदाच पवार यांचे नातू पार्थ यांची छबी झळकली आहे. त्यामुळे राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार मावळातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी देखील मुले स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. मी त्यांना रोखू शकत नाही, असे सांगितले होते.

आजपर्यंत कधीही शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागणाऱ्या फलकावर पार्थ पवार यांची छबी झळकली नव्हती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच पार्थ पवार यांची छबी झळकली आहे. त्यामुळे पार्थ मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार का ? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

अजित पवार यांनी शहरातूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1991 मध्ये पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा सहभाग असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. निवडून येत त्यांनी संसदेत प्रवेश केला होता. वडिलांप्रमाणेच पार्थ देखील पिंपरी-चिंचवडचा परिसर येत असलेल्या मावळातून लोकसभेची निवडणूक लढवून राजकारणाचा श्री गणेशा करणार का ? अशी चर्चा सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नसली तरी शरद पवार यांना मानणारा वर्ग शहरात आणि मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. शहराशी कोणताही संबंध नसताना नार्वेकर यांना पावणेदोन लाखाच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे पवार कुटुंबातील सदस्य आणि स्वतः अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळच्या रणांगणात उतरल्यास ते कडवी झुंज देऊ शकतात. पार्थ उमेदवार असल्यास विरोधकांसमोर कडवे आव्हान निर्माण होईल, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे शरद पवार यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांच्याकडून राजकीय धडे गिरवीत आहेत. पवार यांच्या कोकण दौऱ्यात देखील पार्थ पवार त्यांच्यासोबत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात देखील पार्थ यांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे पवारांची तिसरी पिढी आगामी लोकसभा निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करते का ? याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.