Pimpri: शहराचा अर्धा भाग कच-यात; महापालिकेच्या ठेकेदाराला नोटीसावर नोटीसा, दंडात्मक कारवाईची तरतूदच नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. घरोघराचा कचरा संकलित केला जात नाही. सर्वत्र कच-याचे ढिगच्या ढिग साचले आहेत. कच-याचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे. करारनाम्यातील अटी-शर्ती कंत्राटदाराच्या हिताच्या असल्याने कारवाई करताना आरोग्य विभागाची कोंडी झाली आहे. करारनाम्यानुसार पहिले सहा महिने महापालिका कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईच करु शकत नाही. त्यामुळे केवळ महापालिका कंत्राटदाराला नोटीसावर-नोटीसा धाडत असून आठ दिवसात दोनवेळा कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना देण्यात आले. तर, दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.

ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंत्राटदार करत असलेल्या दक्षिण भागाच्या कचरा संकलन आणि वहन या कामाचा बोजवारा उडाला आहे. ‘अ’, ‘ब’, ‘ग’, ‘ड’ आणि ‘ह’ परिसरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे आहे. या परिसरातील घरोघरचा कचरा संकलित केला जात नाही. वाहनांची उंची जास्त असल्याने कचरा टाकताना अडचणी येत आहेत. महिलांचा हात पुरत नसल्याने हाल होत आहेत.

  • प्रत्येक वाहनावर असलेल्या तीन कर्मचा-यांच्या संख्येत एकने कपात केल्याने, कचरा उचलण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. ए.जी. एन्वायरो इन्फ्रा या कंत्राटदाराकडे कचरा संकलनासाठी केवळ 53 छोट्या गाड्या आहेत. गाड्यांची ही संख्या अतिशय नगण्य आहे. त्यामुळे कंत्राटदाराला आणखीन 30 ते 38 गाड्या वाढवाव्या लागणार आहेत.

गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचलण्यावरुन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. कचराकुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळा सुरु झाल्याने, संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता आहे.

  • करारनाम्यातील अटी-शर्ती कंत्राटदाराच्या हिताच्या असल्याने कारवाई करताना आरोग्य विभागाची कोंडी झाली आहे. करारनाम्यानुसार पहिले सहा महिने महापालिका कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईच करु शकत नाही. त्यामुळे केवळ महापालिका कंत्राटदाराला नोटीसावर-नोटीसा धाडत आहे. गेल्या आठ दिवसात महापालिकेने कंत्राटदाराला दोनवेळा नोटीस दिली आहे.

याबाबत बोलताना आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंत्राटदार कचरा संकलन आणि वहन करत असलेल्या ‘अ’, ‘ब’, ‘ग’, ‘ड’ आणि ‘ह’ परिसरात कच-याची समस्या मोठी आहे. कंत्राटदाराकडे कचरा संकलनासाठी केवळ 53 छोट्या गाड्या असून आणखीन 30 ते 38 गाड्या वाढवाव्या लागणार आहेत. रस्त्याच्या कडेचा आणि कचरा कुंडीबाहेरील कचरा उचलून गाडीत टाकणे आवश्यक आहे. कचरागाडीवर एकच कर्मचारी असल्याने मोठ्या गृहनिर्माण सोसायटीतील एका माणसाने कचराकुंडी उचलताना मदत करणे आवश्यक आहे.

परिसरातील संपूर्ण कचरा तातडीने उचलण्यात यावा. शहर स्वच्छ ठेवावे. संपूर्ण कचरा गोळा करावा याबाबत यापूर्वी एखदा ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदाराला नोटीस बजाविली होती. आज पुन्हा आयुक्तांनी दोन ते तीन दिवसात संपूर्ण कचरा उचलून शहर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. कंत्राटदाराला नोटीस देण्यात येणार आहे. उत्तर भागातील कचरा संकलन आणि वहनाबाबत किरकोळ तक्रारी येत आहेत. कंत्राटदार बी.व्ही.जी इंडिया यांच्याकडे कचरा संकलन आणि वहनासाठी 110 छोट्या गाड्या आहेत. त्यामुळे जास्त तक्रारी नाहीत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.