Pimpri: ‘अण्णासाहेब मगर स्टेडीयमचा तीस दिवसात ताबा द्या’

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमचा महिन्याभरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ताबा हस्तांतरित करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी केली आहे. तसेच ताबा न दिल्यास होणा-या कायदा आणि सुव्यवस्थेला महापालिका जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यामध्ये 1992 साली झालेल्या करारानुसार अण्णासाहेब मगर स्टेडियम ही कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची सुसज्ज वास्तू पिंपरी-चिंचवड महापालिकेला हस्तांतरित केली आहे. त्या मोबदल्यात महापालिकेने काही रक्कम आणि चार भूखंड कामगार कल्याण मंडळास देण्यात येणार होते. परंतु, दिलेल्या आश्वसानाबाबत आणि अद्यापही करारानुसार कोणतीही कारवाई झाली नाही.

करारानुसार अटी-शर्तीचा भंग झाला आहे. त्यामुळे येत्या तीस दिवसात अण्णासाहेब मगर स्टेडियमचा महिन्याभरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ताबा हस्तांतरित करण्यात यावा. ही शेवटची मागणी आम्ही करत आहोत. तीस दिवसात कार्यवाही न झाल्यास होणा-या कायदा-सुव्यवस्थेच्या समस्येला महापालिका जबाबदार राहील, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.