Pimpri: महापालिका कर्मचा-यांसाठी आता आरोग्य विमा; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच सेवानिवृत्तांना देखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात आली आहे. धन्वंतरीऐवजी प्रत्येक कर्मचा-याला आरोग्य वीमा योजना लागू करण्यास महासभेने मान्यता दिली. दरम्यान, धन्वंतरी योजनेसाठी चार वर्षांत 60 कोटी 91 लाख रुपये मोजले आहेत.

1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचा-यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली होती. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होते. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली आहे. ही संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचा-यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात होती. तर, सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिका-यांच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जात होते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत होता. धन्वतंरी योजनेचा खर्च वाढता असल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी आरोग्य वीमा योजना लागू केली जाणार आहे.

  • कर्मचा-यांसाठी ‘वैद्यकीय विमा’ बाबत नव्याने धोरण तयार करण्यासाठी मेसर्स के.एम. दस्तूर रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. या एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय विम्यामध्ये धन्वंतरी स्वास्थ योजनेच्या धर्तीवर वैद्यकीय विमा योजना निश्चित केली जाणार आहे. निविदेव्दावेर इन्शुरन्स कंपनीची निवड केली जाणार आहे. वैद्यकीय विम्यांतर्गत प्रति कुटुंब तीन लाख रुपयाचा विमा उतरविण्यात येणार आहे. आजाराच्या स्वरुपानुसार ही मर्यादा 20 लाखापर्यंत वाढविण्यात येणार आहे. यासाठी दहा कोटीचा निधी निश्चित केला आहे. धन्वंतरी योजनेनुसार निश्चित करण्यात आलेले आजार, उपचारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दुर्धर आजारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

धन्वंतरीमध्ये समाविष्ट असणा-या 93 रुग्णालयासह भारतातील सहा हजार रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार योग्य त्या रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य होणार आहे. दुर्धर आजारांवरील जे उपचार राज्याबाहेर उपलब्ध आहेत. असे उपचार देखील घेणे शक्य होणार आहे. कर्मचारी महासंघाशी चर्चा करुन वैद्यकीय विम्याकरिता अधिकारी, कर्मचारी यांच्या हिश्यानुसार दरमहा वेतनातून कपात करावयाची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.