Pimpri: आरोग्य, मीटर निरीक्षकाची वेतनवाढ स्थगित, वीज पर्यवेक्षकास ‘समज’

एमपीसी न्यूज – दुबार हजेरी पत्रक बनविणाऱ्या आरोग्य निरीक्षकाची एक आणि पदाचा गैरवापर करुन नागरिकांना विशिष्ट कंपनीचे पाणी मीटर बसविण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या मीटर निरीक्षक महिलेच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्यात आल्या आहेत. तर, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील वीज पर्यवेक्षकाला समज देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

आरोग्य निरीक्षक सुनील पांडुरंग वाटाडे, मीटर निरीक्षक शितल रोहित चतुर्वेदी यांची वेतनवाढ स्थगित केली आहे. तर, वीज पर्यवेक्षक बापुसाहेब गोविंद रोकडे यांना समज देण्यात आली आहे. सुनील वाटाडे यांनी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असताना वरिष्ठांची मान्यता न घेताच अनाधिकाराने दुबार हजेरीपत्रक बनविणे, गैरहजर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत शिफारस करणे, औष्णिक धुरीकरणाचे कामकाजासाठी वापरण्यात आलेले इंधन व औषधांचा अवास्तव वापर करुन महापालिकेचे आर्थिक नुकसान केले होते. व्दिसदस्यीय समितीच्या चौकशीत वाटाडे यांनी दुबार हजेरी मस्टर बनविल्याचे मान्य केले. विभागप्रमुखांच्या शास्तीच्या कारवाईच्या शिफारशीनुसार वाटाडे यांची एक वेतनवाढ भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम न करता तात्पुरत्या स्वरुपात रोखून ठेवली आहे.

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात मीटर निरीक्षक म्हणून कार्यरत असताना शितल चतुर्वेदी यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांना अभिप्रेत असलेल्या कंपनीचे पाणी मीटर बसविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले. स्व:लाभासाठी दुषित हेतुने गंभीर स्वरुपाचे गैरकृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या दोन वेतनवाढी स्थगित केल्या आहेत. तर, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाक्षेत्रातील निगडीतील अंकुश चौकात महापालिकेच्या विद्दूत खांबातील विद्युत प्रवाहामुळे ‘शॉक’ लागून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याने वीज पर्यवेक्षक असलेल्या बापूसाहेब रोकडे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर निलंबन रद्द करुन खातेनिहाय चौकशी करण्यात आली.

चौकशी अहवालात रोकडे यांच्यावर ठेवलेले दोषारोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी शास्तीची कारवाई करु नये, अशी विनंती केली होती. त्यानुसार एकवेळ संधी म्हणून रोकडे यांना समज देण्यात आली आहे. यापुढे कार्यालयीन कामकाजामध्ये निष्काळजीपणा केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या आदेशाची तिघांच्याही सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.