Pimpri: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला; पाणीकपात टळली !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. 1 जूनपासून 434 मिमी पाऊस पडला आहे. तर, गेल्या 24 तासात 90 मिमी पाऊस झाला असून 2.33 टक्के पाणीसाठा वाढला आहे. धरणात आजमितीला 17. 43 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासियांचे आणखीन पाणी कपातीचे संकट टळले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने टप्पा-टप्प्याने पाणी कपात केली. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा तर त्यामध्ये वाढ करत एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला.

यंदा पहिल्यांदाच धरणात पाणीसाठा सर्वांत कमी म्हणजेच 13 टक्यांवर आला होता. पावसाला विलंब होत असल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आणखीन पाणीकपात वाढवून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत दिले होते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यात 4 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आणखीन पाणीकपातीचे शहरवासियांवरील संकट टळले आहे.

पवना धरण परिसरात 1 जूनपासून 434 मिमी पाऊस पडला आहे. तर, गेल्या 24 तासात 90 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात 2.33 टक्के पाणीसाठा वाढला असून धरणात 17.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासियांचे आणखीन पाणी कपातीचे संकट टळले आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आणखीन पाणीकपात केली जाणार नाही. एक दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवण्यात येणार आहे. धरणातील पाणी साठ्यातील वाढीचा अंदाज घेऊन पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.