Pimpri : ‘शिवरायांचा इतिहास’ हा समाज जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नव्हे – इरफान सय्यद

साद सोशल फौंडेशन व जुन्नर तालुका मुस्लीम विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा समाज जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. त्यामुळेच आज हिंदू-मुस्लीम समाजाने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांविषयीचा खरा इतिहास जाणून घेण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन इरफान सय्यद यांनी केले.

इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यात हिरारीने सहभाग घेणारी साद सोशल फौंडेशन व जुन्नर तालुका मुस्लीम विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज मंगळवारी (दि. 18) रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर जमणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘जय भवानी, जय शिवाजी ‘ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ या घोषणा ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच ! छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व जाती-धर्माच्या ‘ मावळ्यांना ‘बरोबर घेऊन गाजवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण राहावी, नव्या पिढीला त्यापासून स्फूर्ती मिळावी. यासाठी दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा साजरा होत असतो. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं आणि शिवजन्मस्थळाचं दर्शन घेणं ही एक आनंददायी घटनाच असते.

या आनंददायी पर्वामध्ये महाराष्ट्रातील सर्व हिंदूधर्मीय समाज सहभागी होतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य केवळ एका धर्मासाठी मुळीच नव्हते. सर्वधर्मसमभाव या पद्धतीने त्यांनी सर्वांनाच समान वागणूक दिली. ‘रयतेच राज्य’ याशिवाय त्यांना कुठलाही धर्म, पंथ दिसत नव्हता. त्यांच्या वृत्तीमुळेच आजही मुस्लीम समाजाला छत्रपती हवेहवेस वाटतात.

परंतु, देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण पेटलेले आहे. देशभरात CAA आणि NRC च्या विरोधात मोर्चे आंदोलनं केली जात आहेत. देशातील धर्माध सत्ता हिंदू-मुस्लीम समुदायात फुट पडण्यासाठी हिंदू-मुस्लीमविरोधी धोरण आमलात आणू पाहत आहे. CAA आणि NRC च्या मुद्द्यावरुन खासकरून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण आहे. हिंदू-मुस्लीम सामाजिक एकोपा यांचा बांध फुटू पाहत आहे. अशा परिस्थितीत छत्रपतींची शासन नीतीच या देशाला व राज्याला मार्गदर्शक आहे. शिवाजी महाराजांची शिकवण अंगी बाळगणाऱ्या तरुणांची आज कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत मुस्लीम समाजातील असूनही, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘मी मर्द मावळा’ या उक्तीप्रमाणे आचरण करणारे व दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणारे मुस्लीम बांधव व कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचे शिवविचार सर्वांपुढे आदर्शवत आहेत.

दरम्यान, शिवप्रेमी शिवभक्तांसाठी अलपोपहर, शिरखुर्मा, वाटप कार्यक्रम तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला इरफान सय्यद व मुस्लिम बांधवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुस्लिम बांधवानी यात सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

यावेळी त्यांनी दिलेल्या ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. शिवजन्म सोहळ्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटनांना उजाळा देत, लेझीम पथक, झांजपथक, घोडेस्वारांसह मिरवणुकीने शिवभक्तांसमोर शिवकाल उभा केला. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवे फेटे परिधान केलेले बाल मावळे, युवतींचे लेझीम पथक, घोडेपथक, बालशिवाजी, पारंपरिक वेषभूषेतील युवती सहभागी झाल्या होत्या. सनई, चौघडा, ढोल-ताशे, लेझीम पथक, हलगी पथक, पारंपरिक वेशभूषेतील बॅंडपथक झांजपथकेही यात सहभागी झाली होती.

दरम्यान, शिवनेरी गडावर महाराजांच्या दर्शनासाठी विविध गड-किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या विविध मंडळांचे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील दुर्गम अशी गावं, शहरं या ठिकाणाहून येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी साद सोशल फौंडेशन व जुन्नर तालुका मुस्लीम विभागाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी पंचायत समिती सभापती दशरथ पवार, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, माजी सभापती बाजीराव डोले, उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी,अल्पसंख्यक समिती सदस्य राजुभाई इनामदार,मेहबूब काझि,अंजुमन हाईस्कूल सईद पटेल,नगरसेवक भाउ कुंभार, अमितशेठ बेनके,मोबिन शेख,यासीन सय्यद,एजाज चौधरी, दस्तगीर मनियार, रजाक इनामदार, जुबेर शेख,तौसीब आतार, जर्रार कुरेशी,वाजिद इनामदार हाजी मुअज्जम कागजी, इद्रीस शेख, सोहेल शेख,सईद शेख,इरफान पठान, सलीम पठान,आकिलभाई शेख,फैजान कुरेशी, मझर कुरेशी, तसेच आइकॉन हॉस्पिटलच्या वतीने डॉ. योगेश पाटिल,डॉ. गोपाल जिजोते यावेळी उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी बिड जिल्ह्यातून सलग ६ वर्षे मुस्लिम मावळा शेख समीर बादशाह शिवज्योत घेऊन शिवजन्म भूमिवर येतो त्यांचा देखील जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

समुदायास मार्गदर्शन करताना इरफान सय्यद म्हणाले की, महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत असणारा मुस्लीम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा राज्याच्या लोकसंख्येतील वाटा ११ टक्के असून हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समाजघटक आहे. मुस्लीम समाजात छत्रपती शिवाजी महाराज आज तितकेच प्रासंगिक आहेत. त्याचे कारण म्हणजे शिवाजी महाराजांचे रयतेसाठीची धोरणे. शिवाजी महाराज यांनी कधीही जाती – धर्माच्या नावाने भेदाभेद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का? शिवकालीन लढा धार्मिक नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. त्यांना साथ देणारे मराठा , माळी , धनगर , रामोशी , मातंग, महार , आग्री , वंजारी , कोळी इत्यादी होते. तसेच त्यांच्या सैन्यात मुस्लीमदेखील होते. शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. पन्हाळा वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यासाठी हे मुस्लीम मावळे नेताजी पालकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. आरमारदलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानाची नेमणूक केली. शिवरायाकडे अत्याधनिक तोफखाना होता, इब्राहिम खान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावंत पठाणांची फौज होती. विजापूरला मोठा दुष्काळ पडला असताना शिवरायांनी आदिलशहाच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी अर्थात आदिलशाही राज्यातील प्रजेला दहा हजार ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवली.

शिवरायांचे स्वराज्य रयतेचे स्वराज्य होते. शिवकालीन लढाई हिंदू – मुस्लीम लढाई नव्हती. आज राजकीय हेतू समोर ठेवून शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, असे कथा, कादंब-या, चित्रपट, मालिका, प्रसारमाध्यमं यातून बिंबवले जात आहे. पण वस्तुनिष्ठ इतिहास सागंतो शिवरायांचे अनेक निष्ठावान मुस्लीम सहकारी होते. इतिहास हा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी असतो.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साद सोशल फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी आणि जुन्नर तालुका मुस्लिम विभागाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.