Pimpri : संगीतकार खय्याम यांना सांगीतिक आदरांजली

शब्दधन काव्यमंच आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठानचा पुढाकार

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंच आणि स्वयंसिद्धा प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांना बीना इंग्लिश स्कूल, आकुर्डी येथे त्यांनी स्वरबद्ध केलेल्या सिनेगीतावर आधारित “करोगे याद तो हर बात याद आयेगी” या सांगीतिक कार्यक्रमातून साहित्यिकांनी आदरांजली समर्पित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्यांना खय्याम यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असे संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे होते. याप्रसंगी बीना एज्युकेशन ट्रस्टचे आझमखान, प्रा. तुकाराम पाटील, रमेश वाकनीस, निशिकांत गुमास्ते, तानाजी एकोंडे, आत्माराम हारे, सुप्रिया सोळांकुरे, बी.एस.बनसोडे उपस्थित होते.

याप्रसंगी नितीन हिरवे म्हणाले, “खय्यामजी यांची भेट माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. शब्दांना संगीतसाज देताना त्यांनी सुमारे ७१ चित्रपटांमधून सहाशेहून अधिक गीतांना अप्रतिम चाली दिल्या. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद कसाही बनवला तरीही गोडच लागतो, अशाच अवीट गोडीची गाणी खय्याम यांनी दिली”

या सांगीतिक मैफलीची सुरुवात कवी आणि गायक देवेंद्र गावंडे यांच्या ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ या गीताने झाली. त्या नंतर गावंडे यांनी ‘बाजार’ या चित्रपटातील ‘फिर छिडी रात, बात फुलोंकी…’ हे गीत सुरेल आवाजात सादर केले. सर्पमित्र आणि गायक दीपक शर्मा यांनी ‘मोहब्बत बडे कामकी चीज है’ (त्रिशूल), ‘ जीतही लेंगे बाजी हम तुम’ हे  1955 सालातील ‘शोला और शबनम’ या चित्रपटातील गाजलेले गीत आणि ‘हजार राहे मुडके देखी…’ (थोडीसी बेवफाई) ही सदाबहार गीते सादर केली.

कवी रघुनाथ पाटील यांनी ‘आंखोमें हमने आपके सपने सजाये है’ (थोडीसी बेवफाई) सविता इंगळे आणि दीपक शर्मा यांनी सादर केलेले ‘जानेमन तुम कमाल करती हो’ हे युगुलगीत रसिकांची दाद मिळवून गेले. डॉ.शुभा लोंढे यांनी ‘ ये दिल-ए नादान’ ( रझिया सुलतान) आणि ‘बहारों मेरा जीवन भी सवारों…’ (आखरी खत), नंदकुमार कांबळे यांनी ‘मै पल दो पलका शायर हु’ आणि सुभाष चव्हाण यांनी ‘कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है’ ही गाजलेली खय्याम यांची गीते सादर केली. राज अहेरराव, बशारत अली खान, आय.के.शेख, उज्ज्वला केळकर, शोभा जोशी यांनी सादर केलेल्या खय्याम गीतांना रसिकांनी दाद दिली.

प्रास्ताविक शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात अविनाश कंक, विद्या कंक, अंतरा देशपांडे, फुलवती जगताप, अजित जगदाळे, वर्षा जगदाळे, गणपती पांचाळ, युवराज गायधनी, अभिजित काळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले. गीतगायन केलेल्या साहित्यिकांना सिनेगीत पुस्तके खय्याम यांची आठवण म्हणून देण्यात आली. आभार दिनेश भोसले यांनी मानले.
‘दिल चीज क्या है…’ या गीताने या सांगीतिक मैफलीचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.