Pimpri: कामगारांअभावी गॅस एजन्सींकडून ‘होम डिलिव्हरी’ बंद; किराणाही मिळेना ‘घरपोच’

कोरोनाच्या भितीने औद्योगिकनगरीतील कामगार वर्ग गेला मूळगावी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या भितीमुळे कामगार, उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार वर्ग आपल्या मूळगावी परत गेला आहे. त्याचा फटका जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना आणि दुकानांना बसला आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर कामगारांचा तुटवडा आहे. कामगारच नसल्याने गॅस एजन्सींनी सिलेंडरची ‘होम डिलिव्हरी’ देखील बंद केली आहे. दरम्यान, शहरातून जवळपास सात लाखाहून अधिक नागरिक आपल्यागावी गेले आहेत. परिणामी शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू असतानाही नागरिकांना गॅस आणि अन्य जीवनावश्यक साहित्यांसाठी नाईलाजाने घराबाहेर पडावे लागत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची देशभरात कामगार, औद्योगिकनगरी अशी ओळख आहे. शहरात टाटा मोटर्स, बजाज, फोर्स मोटर्स, महिंद्रा अॅटलास कॉप्को, अल्फा लावल, सँडविक, मार्शल, इमर्सन, एसकेएफ, केएलबी, फिनोलेक्स, सेंच्युरी एन्का अशा मोठ-मोठ्या नामांकित औद्योगिक कंपन्या आहेत. हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. मोठी एमआयडीसी आहे. त्यामुळे देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून नागरिक पोटापाण्यासाठी औद्योगिकनगरीत वास्तव्याला आले आहेत.

महाराष्ट्रातील बीड, उस्मानाबाद, लातूर या मराठवाड्यातील नागरिकांची शहरात मोठी संख्या आहे. तसेच सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, खान्देशातील जवगाव भागातील नागरिकांची देखील शहरात मोठी संख्या आहे. मात्र, शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने अनेक कामगार आपापल्या गावी निगुन जाऊ लागले. त्यात शहरातील कोरोनाबाधितांची सुरुवातील राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक होती. त्यामुळेही नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातून अनेक नागरिक कुटुंबियांसह मिळेल त्या वाहनाने आपल्या मूळ गावी गेले.

यामध्ये कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्याचा परिणाम आता शहरात जाणवू लागला आहे. शहरातील पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, किराणामालाची दुकाने व अन्य जीवनावश्यक साहित्य घरपोच देणे बंद झाले आहे. घरातील गॅस संपल्याने नागरिकांना गॅस एजन्सीत जाऊन गॅस आणावा लागत आहे. यांच्याकडे दुचाकी किंवा अन्य वाहने आहेत. त्यांना गॅसची वाहतूक करताना अडचण येत नाही. परंतु, ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही त्यांना गॅस घरी घेऊन येणे म्हणजे मोठे दिव्य वाटत आहे. त्यात रिक्षाचालकही संचारबंदीमुळे येण्यास नकार देत आहेत. जे येण्यासाठी तयार होतात ते अवाच्या सव्वा भाडे आकारात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.

कोरोना विषाणूने शहरात शिरकाव करताच भितीमुळे कामगार वर्ग आपल्या मूळगावी परत गेला आहे. औद्योगिकनगरी खाली झाली आहे. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. कामगार आपल्या गावी परतल्याने औद्योगिक कंपन्या, हॉटेल, खानावळी पासून अनेक व्यवसाय बंद आहेत. पेट्रोल पंपावर देखील कामगारांचा तुटवडा आहे. शहरातून जवळपास सात लाखाहून अधिक आपल्यागावी परतले आहेत. त्यामुळे कामगार नगरीतील खडखडाट थांबली आहे.

कामगार नसल्याचा फटका गॅस एजन्सींना देखील बसला आहे. काही एजन्सींची सिलेंडरची ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे गॅस घेण्यासाठी नागरिकांची एजन्सीसमोर गर्दी होताना दिसून आहे. रिक्षा देखील मिळत नाहीत. त्यामुळे गॅस आणण्यासाठी नागरिकांची तारांबळ होत आहे. एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.