Pimpri: ‘होम क्वारंटाईन’मध्ये 1160 रुग्ण; उल्लंघन करणाऱ्या 13 जणांना नोटीस

दहा जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले; कोरोना बाधितांचा आकडा स्थिर

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 160 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. त्यापैकी क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 जणांना महापालिकेने नोटीस बजाविली आहे. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन करुन नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. दरम्यान, शहरात बाधित 12 रुग्ण आहेत. तर, दहा जणांच्या घशातील द्रवाचे नमुने आज (मंगळवारी) तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. तर, 4 लाख 18 हजार 7 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 137 व्यक्तींचे कोरोनाकरीता घश्यातील द्रव्यांचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी आजअखेर 112 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 12 आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयाच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच आज (मंगळवारी) दहा संशयितांना महापालिका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची 244 कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहे. आजपर्यंत शहरातील चार लाख 18 हजार 7 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या 1 हजार 160 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. सूचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. क्वारंटाईनचे उल्लंघन केलेल्या 13 नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 14 दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. नागरिकांनी घरी, कामाच्या ठिकाणी अथवा वाहनामधील वातानुकुलीत यंत्रणेचा वापर टाळावा. तसेच शहरात कलम 144 लागू आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येत असून अत्यंत आवश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like