Pimpri: ‘परदेशवारी केलेल्यांना ‘होम क्वॉरंटाईन’ बंधनकारक; कामगारांना ‘वर्क फॉर होम’ची मूभा द्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंपन्यांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वंच कंपन्यांनी कामगारांना ‘होम टू वर्क’ची मूभा द्यावी. त्याचबरोबर बाधित दहा देशासह परदेशवारी करुन आलेले कंपनीचे व्यवस्थापक, कामगार यापैकी कोणीही आल्यास त्यांना 14 दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ करणे बंधनकारक आहे. ते 14 दिवस घरी वेगळ्या कक्षात राहतात का याची कंपन्यांनी खात्री करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी कंपन्यांच्या व्यवस्थापकांना केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कंपन्यांच्या व्यवस्थापकांसोबत महापालिकेने आज (बुधवारी) बैठक घेतली. पिंपरी, चिंचवड, चाकणमधील कंपन्यांचे व्यवस्थापक बैठकीला हजर होते. राजीव गांधी इन्फोटेक आयटी पार्कमधील कंपनीचे प्रतिनिधी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे’ सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी या वेणी उपस्थित होते.

संतोष पाटील म्हणाले, चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस घरांमध्येच ‘होम क्वॉरंटाईन’ करणे बंधनकारक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना ‘वर्क फॉर होम’ची मूभा देणे आवश्यक आहे. मोठ्या कंपन्यांनी घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. परंतु, शहरातील सर्वंच कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱ्यांना तरी घरुन काम करण्याची मुभा द्यावी, अशी सूचना केली.

कंपनीतील कोणता कर्मचारी परदेशात गेला आहे आणि परदेशातून कोण आला आहे, त्याची माहिती द्यावी. परदेशातून कोणी भेटायला आले असल्यास त्याची ताबडतोब माहिती द्यावी. परदेशातून आलेल्यांना 14 दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ झाल्याशिवाय कामावर घेवू नये. ‘क्वॉरंटाईन’ झाला आहे की नाही याची खात्री केली पाहिजे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.