Pimpri: घरमालकाचा आडमुठेपणा; रुग्णाला होम ‘आयसोलेट’ होवू देण्यास नकार, दारात थांबविले

Pimpri: homeowner's Refusing to allow the patient to be home ‘isolated’, stopped at the door पॉझिटिव्ह पण घरी आयसोलेटची व्यवस्था असलेल्या रुग्णाला मालकाने घरात येवू देण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णांवर घराबाहेर थांबण्याची वेळ आली.

एमपीसी न्यूज- वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत, घरी आयसोलेटची व्यवस्था असलेल्या रुग्णांना होम ‘आयसोलेट’ होण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. पण, घर मालकांकडून त्याला विरोध केला जात आहे. रुग्ण आणि मालकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय आज पिंपरीगावात आला. पॉझिटिव्ह पण घरी आयसोलेटची व्यवस्था असलेल्या रुग्णाला मालकाने घरात येवू देण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णांवर घराबाहेर थांबण्याची वेळ आली. अखेर रुग्णांवर पुन्हा वायसीएम रुग्णालयात जाण्याची वेळ आली. दरम्यान, घरमालकांनी रुग्णांना त्रास देवू नये. व्यवस्था असल्यास होम आयसोलेट होण्यास विरोध करु नये. अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, पिंपरीगावातील तपोवन मंदीर परिसरात राहणा-या एका व्यक्तीला 26 जून रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर दोन दिवस वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते.

त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांची घरी आयसोलेट राहण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे महापालिकेने उपचाराला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्याने घरी आयसोलेट होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडून दिले. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार हा रुग्ण आपल्या भाड्याने असलेल्या थ्री बिच-के फ्लॅटमध्ये आयसोलेट होण्यासाठी घरी आला. परंतु, मालकाने या रुग्णाला घरात येवू देण्यास नकार दिला.

महापालिकेने घरीच आयसोलेट होण्याची परवानी दिली असून त्याचे कागदपत्रे रुग्णाने दाखविले. तरीही, मालकाने घरात येवू देण्यास नकार दिला. निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय इमारतीत येवू देणार नसल्याची भूमिका घेतली.

रुग्णाला इमारतीबाहेर थांबावे लागले. अनेकांनी समजूत काढूनही मालक ऐकण्यास तयार झाला नाही. अखेर रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मालकाच्या असमंजसपणाच्या भुमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

घरमालकांनी सहकार्य करावे, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल- अतिरिक्त आयुक्त

याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, रुग्ण संख्या वाढत आहे. लक्षणे, गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी बेडची आवश्यकता आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत. घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था आहे. अशा रुग्णांना घरी आयसोलेट होण्याची परवानगी दिली आहे.

रुग्णामध्ये व्हायरस कमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर होऊ शकत नाही. अशी खात्री पटल्यास सरकारच्या निर्णयानुसार त्या रुग्णांना घरी होम आयसोलेट ठेवू शकतो.

स्वतंत्र फ्लॅट आहे. त्यासाठी स्वतंत्र खोली असेल. घरातील केअर टेकर असेल. अशा रुग्णांना होम आयसोलेटला परवानगी आहे. त्यामुळे घर मालकांनी विरोध करु नये.

विरोध करणा-या पुण्यातील एका घरमालकाविरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. असे केल्यास गुन्हा दाखल करण्यास घर मालक पात्र होवू शकतात. घरमालकांनी सहकार्य करावे. अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल.

रुग्ण आणि घर मालकांमध्ये संघर्षाचा प्रश्न

ज्या रुग्णांची घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था आहे. अशा रुग्णांना पालिकेकडून घरी सोडले जाते. पण घरमालकांकडून विरोध केला जातो. आजूबाजूच्या नागरिकांकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे आता संघर्षाचे प्रश्न निर्माण होवू लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like