Pimpri: हॉटेल व्यावसायिकांनो ! ग्राहकाने मागणी केल्यास खाद्यपर्थाची ‘होम डिलेव्हरी’ करा; अन्यथा कारवाई

महापालिकेचा इशारा; गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी  समन्वय कक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने सर्व हॉटेल्स व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठीच्या खानवळी, महाविद्यालय, वसतीगृहातील मेस यांनी फोनवरुन खाद्यपदार्थांची मागणी केल्यानंतर ‘होम डिलेव्हरी’ पार्सल स्वरुपात करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

तसेच अन्न आणि शिधा याची गरज असणा-या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही  नागरिकांवर उपजिवीकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृध्द, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आदींचा समावेश आहे.

या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. अन्न आणि शिधा याची गरज असणा-या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या पर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे.

या कक्षाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त संदिप खोत काम पाहत आहेत. भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलातून या कक्षाचे काम सुरु झाले आहे. या कामकाजासाठी स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहचवण्यासाठी कार्यरत असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.