Pimpri : ‘झूम’वरील संवाद कितपत सुरक्षित?; झूमचे कार्यालय कॅलिफोर्नियात तर, डेटा सेंटर चीनमध्ये!

   (श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी आपापल्या घरी कोंडले गेले आहेत. त्यांच्याशी एकत्रित सामूहिक संवाद साधण्यासाठी अनेकजण ‘झूम’ या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करताना दिसत आहेत. शाळा, महाविद्यालये सुद्धा यात मागे नाहीत. अनेक शाळा, महाविद्यालयांनी झूम अ‍ॅपद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करणे, शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी घेणे असे कार्यक्रम सुरू केले आहेत. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा प्रामाणिक हेतू यामागे आहे. पण, आपण संवाद साधण्यासाठी वापरत असलेला प्लॅटफॉर्म खरंच सुरक्षित आहे का? वापरत असलेल्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या मोबाईलमधील महत्वपूर्ण माहितीची चोरी तर होत नाही ना? याबाबत माहिती करून घेणं फार गरजेचे आहे. कारण, झूमचे कार्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. पण, कंपनीचे डेटा सेंटर चीनमध्ये आहे.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाच्या विषाणूने अवघ्या चार महिन्यात जगाच्या सुमारे 195 देशांची यात्रा केली. अमेरिका, स्पेन, जर्मनी, इटली, फ्रांस, ब्रिटन, इराण, स्वित्झर्लंड यांसारख्या देशात कोरोना चांगलाच रमलेला दिसून येतो. त्यामुळे जवळपास सर्व देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. काही देशातील बाधित नसलेल्या भागातील जनजीवन सुरळीत सुरू आहे. मात्र, एका विषाणूमुळे जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था तळाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्व देश सर्व पातळ्यांवर लढत आहेत. अशा परिस्थितीत झूम अ‍ॅप्लिकेशनच्या नव्या वादाने तोंड वर काढले आहे.

झूमचे आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेण्यापूर्वी त्याचा वापर कसा आणि कोण करत आहेत?, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सुरुवातीला जमावबंदी, नंतर जनता कर्फ्यु, संचारबंदी, मायक्रो कर्फ्यु, परिसर सील करणे असे अनेक उपाययोजनांचे प्रकार ठिकठिकाणी अमलात आणले गेले. लॉकडाऊनच्या काळात कारखाने, उद्योग, दुकाने, वर्कशॉप, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये बंद झाले. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा सुरू झाला. अचानक रस्त्यावरील वाहने कमी झाल्याने आपण 10-20 वर्ष मागे गेलो की काय असं जाणवायला लागलं.

मित्रांच्या गप्पा मारण्याच्या जागा, कट्टे, अड्डे ओस पडले. कट्ट्यावर भेटून कटिंग विथ सुट्टा अशी ऑर्डर तर किती दिवसांपूर्वी दिली होती हे सुद्धा काहींना आठवत नाही. मार्च, एप्रिलचा कालावधी म्हणजे परीक्षांचा हंगाम असतो. ग्रामीण भागात सुगी आणि शाळेत परीक्षा एकाच कालावधीत सुरू होतात, असं काहीसं चित्र असतं. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. तर अन्य वर्गांच्या परीक्षा ऐन तोंडावर आलेल्या असताना कोरोना येऊन थडकला. त्यामुळे सगळं काही ठप्प झालं. दरम्यान, अचानक विस्कळीत झालेल्या या जनजीवनावर संवादाची फुंकर घालणारे ‘झूम डॉट अस’ हे अ‍ॅप्लिकेशन समोर आले.

याद्वारे सुमारे 100 जणांशी एकाच वेळी व्हिडिओ कॉलद्वारे जोडता येत असल्याने लॉकडाऊनमध्ये दुरावणारी मैत्री, नात्यातील संवाद पुन्हा घडू लागला. अनेक शाळा महाविद्यालयांनी ‘झूम डॉट अस’च्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करणे, शिकवून झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याचा कार्यक्रम सुरू केला.

कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा प्रामाणिक हेतू यामागे होता. तर लॉकडाऊनच्या काळात दुरावणारी मैत्री, नाती पुन्हा जवळ येऊ लागली. कंपनी झूमद्वारे आपल्या बिझनेस मिटिंग करू लागल्या. पण, या सगळ्यात झूम हेच माध्यम का? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे.

तर या झूमद्वारे अत्यल्प खर्च आणि अत्यल्प वेळेत अनेकांना व्हिडिओद्वारे जोडता येतं म्हणून याचा वापर वाढला. झूमच्या प्रसाराबाबत पाहायचं झालं तर झूमचे कोरोनाच्या थैमानापूर्वी जगात 10 मिलियन (एक कोटी) वापरकर्ते होते. कोरोनाचा प्रसार झाला, अन त्यानंतर मार्च 2020 या महिन्यात हा आकडा 200 मिलियन (20 कोटी) पर्यंत गेला. दरम्यान कंपनीचे शेअर मार्केट सातव्या आसमंतात पोहोचले. यातून कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाला. झूमचे कार्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. पण, कंपनीचे डेटा सेंटर चीनमध्ये आहेत. एरीक युवान हा याचा मालक आहे. तो चीनचा रहिवासी असून मोठा उद्योगपती आहे. त्यामुळे यामागे चीनचा आणखी काही डाव नाही ना? अशी शंका अनेकांच्या मनात आली.

झूम डॉट अस हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना मोबाईल मधील अनेक डेटाचा ऍक्सेस घेण्याबाबत संमती घेतली जाते. घाईगडबडीत वापरकर्ते ती संमती त्यास देऊन बसतात. तिथं खरी मेख आहे. एकदा का आपण आपल्या मोबाईलमधील ऍक्सेस दिला की आपल्या मोबाईलमधील डेटा अ‍ॅप्लिकेशनच्या कंपनीकडे जातो. वापरकर्त्यांचा बिहेवीयर पॅटर्न, बँक डिटेल्स, फिटो, व्हिडिओ असा महत्वपूर्ण डेटा आपल्या मोबाईलमध्ये असतो. मोबाईलमधील सुरक्षा आणि प्रायव्हसीची याद्वारे चोरी केली जाते.

सुरुवातीला झूम या अ‍ॅप्लिकेशनमधील डेटा चीन चोरत असल्याची कुणकुण बाजारात सुरू झाली. त्यानंतर कर्नाटक मधील सिटीझन लॅबने यावर तांत्रिक संशोधन केले. त्यात असे निदर्शनास आले की, झूम वापरणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलमधील डेटा चीनकडे जात आहे. याबाबत लॅबने कंपनीशी संवाद साधला असता काही प्रमाणात चीनकडे डेटा जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. पण, झूम कंपनी चीनचा गेटवे वापरत असल्याने चीनकडे डेटा जाणं सहाजिकच आहे. त्यात चीनमधील डेटा प्रायव्हसीबाबतच्या 2017 मधील कायद्यान्वये चीनमधून पास होणा-या सर्व डेटाचा ऍक्सेस चीनकडे राहील अथवा चीन सरकार जेंव्हा डेटा बाबत मागणी करेल तेंव्हा संबंधित कंपनीला तो डेटा चीन सरकारला द्यावा लागेल. एवढे हे जगासमोरील सत्य असताना त्यावर पांघरून घालण्याचा झूमने फसवा प्रयत्न केल्याचे उघड झाले. हे फसवे पांघरून उघडे पडल्यानंतर कंपनीने याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली.

झूमचा वापर केवळ भारतातच नाही, तर जगभरात वाढला आहे. मात्र, हे डेटा चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर अमेरिका, तैवान आणि अन्य काही देशांमध्ये झूमविराधात पावले उचलली गेली. झूमच्या वापरावर कठोर निर्बंध लादण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेना दिवसाच्या निमित्ताने संरक्षण विभागाच्या प्रमुखांशी झूमद्वारे संपर्क साधला आहे. यामध्ये जर गोपनीय वार्तालाप झाला असेल तर त्याचीही माहिती घेणं चीनला सहज शक्य आहे. त्यामुळे झूमच्या वापरावर निर्बंध भारतात देखील घातले पाहिजेत. युरोपमध्येही झूमवर संशोधन सुरू झाले असून ब्रिटनला युनायटेड नेशन्समध्ये याबाबत धाव घेण्यास सांगितले जात आहे. झूमला पर्याय म्हणून मायक्रोसॉफ्ट टीम, सिस्को वेवेक्स, गूगल हँगआऊट हे पर्याय वापरता येऊ शकतात. विद्यार्थी, पालकांनी याबाबत शाळा, महाविद्यालयांना याबाबत सांगून झूमचा वापर थांबवणे गरजेचे आहे.

झूम कंपनीच्या आडून चीन ‘जरा सा झूम लू मैं’ असं म्हणत असेल तर आपण त्याला वेळीच ‘ना रे बाबा.. ना’ म्हणायला हवं. नाहीतर आपल्याला ‘रब्बा मेरे मेनू बचा… ‘ असं म्हणायची वेळ येऊ शकते, असे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.