Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग तीन )

(श्रीपाद शिंदे)

सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल…..

एमपीसी न्यूज – सायबर अपराधांमध्ये महिला आणि लहान मुलांना टार्गेट केले जाते. गोपनीय माहितीद्वारे ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केली जाते. आर्थिक गुन्हे आणि महिला व बालकांवरील सायबर हल्ले हे सायबर गुन्हेगारीचे ढोबळमानाने दोन भाग करता येतील. पहिला भाग आपण मालिकेच्या दुस-या भागात जाणून घेतला. आता महिला व बालके कशी सायबर हल्ल्याची शिकार होतात आणि त्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच सायबर गुन्हेगारीपासून संरक्षण मिळविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे, याची चर्चा करूयात.

चाईल्ड पोर्नोग्राफी हा सायबर अपराधाचा एक प्रकार आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनविणे, ते प्रसारित करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मागील आठवड्यात एका तरुणाने लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरून पसरवले असल्याची माहिती सायबर विभागाच्या निदर्शनास आली. पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली. हा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथे घडला. चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी राज्यासह केंद्र शासनाने देखील कठोर पावले उचलली आहेत.

‘सायबर ग्रूमिंग’ हा देखील बाल लैंगिक अत्याचाराचा एक प्रकार आहे. सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून लहान मुलांशी लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने जवळीक निर्माण करणे. सायबर ग्रुमर आपल्याला भेटवस्तू, प्रशंसा, मॉडेलिंग जॉबची ऑफर देतात. त्यानंतर अश्लील संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवतात. ‘सायबर बुलिंग’ हा दुसरा प्रकार आहे. यामध्ये स्त्रियांना व मुलांना धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास दिला जातो. अश्लील किंवा हानिकारक संदेश, टिपण्या, फोटो, व्हिडिओ पाठवून त्रास दिला जातो. सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकूर संदेश, ई मेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबपृष्ठे, चॅटरूम्स इत्यादींचा वापर करतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक जीवनावर गंभीर परिणाम होतो.

‘मॉर्फिंग’ हा तिसरा प्रकार आहे. मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ चित्र बदलले जाते. महिलांचे मूळ चित्र वेबसाईटवरून डाउनलोड करून मॉर्फिंग करून पुन्हा ते वेबसाईटवर रिपोस्ट केले जाते. काही वेळेला संबंधित व्यक्तीची सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल देखील बनवली जाते. व्यक्तीचा सामाजिक बदनामी करणे हा त्यामागे महत्वाचा उद्देश असतो. ‘सायबर डीफेमेशन’ हा चौथा प्रकार आहे. या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीबाबत चुकीचे विधान करून त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवली जाते. ‘सायबर स्टोकिंग’ या पाचव्या प्रकारात व्यक्तीच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवले जाते. त्याची माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर अपलोड केली जाते. ऑनलाईन गेमिंगचे वेड आताच्या मुलांना मोठ्या प्रमाणात आहे. या गेमिंगच्या आहारी जाऊन मुले चोरी, आत्महत्या, नैराश्य यांना बळी पडतात.

तिन्ही लेखांमध्ये सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात न अडकण्यासाठी ठिकठिकाणी सूचना केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त सायबर अपराधांपासून वाचण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी –

# आक्षेपार्ह मेसेज आल्यास तो डिलीट करू नये. त्याचा वापर पोलिसांना पुरावा म्हणून करता येतो.

# पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअर वापरा

# रात्री उशिरापर्यंत मोबाईल व लॅपटॉप वापरण्यावर मर्यादा ठेवा

# मुले इंटरनेटवर कोणाच्या संपर्कात आहेत का याचा मागोवा घ्या

# मुलांची इंटरनेट ऍक्टिव्हिटी तपासा

# मुले ऑनलाईन सर्फिंग करत असताना त्यात सहभागी व्हा

# मुलांशी त्यांच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी बाबत चर्चा करा

# शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करा

# आपण जागेवर नसताना आपल्या संगणकाची स्क्रिन लॉक करा

# सॉफ्टवेअर अपडेट ठेवा

# महत्वाच्या फाईल्ससाठी पासवर्ड ठेवा

# महत्वाच्या फाईलचा बॅकअप ठेवा

# सोशल साईट्स वर स्वतःची, कुटुंबाची लाईव्ह लोकेशन देणे टाळा

# पायरेटेड सिनेमा, गाणी डाउनलोड करू नका

# वेबकॅम, मायक्रोफोन काम नसताना बंद ठेवा

# वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करू नका

# सिस्टीमचा फायरवॉल चालू ठेवा

# ऑनलाईन भेटलेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात भेटणे शक्यतो टाळा

मोबाईल फोन वापरताना

# मोबाईल फोनला सक्षम पासवर्ड ठेवा

# विश्वसनीय संकेतस्थळावरूनच अॅप डाऊनलोड करा

# मल्टिपल ऑथोंटिकेशन असावे

# बँक किंवा महत्वाच्या अॅप्सला लॉक ठेवा

# आपले पासवर्ड मोबाईलमध्ये स्टोअर करू नका

# विविध अॅप्सला देण्यात आलेल्या परवानग्या नियमितपणे तपासा

सोशल मीडिया वापरताना

# नवीन डिव्हाईस मधून लॉग इन केल्यास वापर झाल्यानंतर लॉग आऊट करा

# सोशल मीडियावर तुमचे स्थान व इतर गोष्टी शेअर करू नका

# चुकीची पोस्ट अपलोड, शेअर आणि लाईक करू नका

# आपल्या खात्याची गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत काय दक्षता घ्यावी, याची माहिती ठेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.