Pimpri : गॅस गिझर वापरताना अशी घ्या काळजी…….

एमपीसी न्यूज- गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे एका 30 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोथरूडमध्ये घडली. या अनुषंगाने घरामध्ये गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अंघोळीला गरम पाण्यासाठी आता घरोघरी गॅस गिझरचा वापर केला जातो. परंतु गॅस गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अनेक जणांना माहिती नसते. त्यातूनच दुर्घटना घडून माणसाचा जीव जातो. या पूर्वी देखील पुण्यात गॅस गिझरच्या दुर्घटनेत काही जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.

गॅस गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी ? गिझरसाठी गॅस सिलेंडर कुठे ठेवावा ? आंघोळीला जाताना काय काळजी घ्यावी, याबाबत पुण्यात पाषाण येथे असलेले गॅस गिझर विक्रेते मोहन हिंगडे यांनी माहिती दिली. मागील 25 वर्षांपासून समर्थ गॅस या नावाने ते गॅस गिझरची विक्री करतात.

गॅस गिझर खिडकीजवळ खिडकीच्या top पासून 6 इंच खाली बसवावा. गिझर चालू करताना अगोदर पाणी चालू करावे नंतर सिलेंडरचा कॉक चालू करावा. गिझर बंद करताना अगोदर सिलेंडरचा कॉक बंद करावा नंतर पाणी बंद करावे. गिझर चालू असताना बादली भरेपर्यंत बाथरूमचा दरवाजा उघडा असावा, गिझर बंद केल्यानंतर दरवाजा लावून घ्यावा. शॉवर घ्यायचा असेल तर दरवाजा अर्धवट उघड ठेवावा. कारण घरातील व्यक्तींना कोण अंघोळीला गेले आहे याची माहिती असते. त्यामुळे दरवाजाला थोडीशी फट ठेवण्यास हरकत नाही. गिझरचे बॅटरी सेल दर तीन महिन्यांनी बदलले गेले पाहिजेत. दरवाजा लावून अर्धा-अर्धा तास शॉवर घेतल्यास बाथरूममधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जीव गुदमरला जाऊ शकतो. कारण दरवाजा लावल्याने अति गरम पाण्याने बाष्प तयार होते व श्वास कोंडला जाऊ शकतो. शक्य असल्यास गॅस गिझर आणि सिलेंडर बाथरूमच्या बाहेर ठेवावा.

वरील प्रकारे काळजी घेतल्यास होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.