Pimpri : शंभर महिलांना मिळणार परमिट आणि नवीन रिक्षाची चावी

परिवहन मंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी वितरण

एमपीसी न्यूज – कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी गुरुवारी (दि. 3 जानेवारी 2019) शंभर महिला रिक्षा चालकांना परमिट आणि नविन रिक्षा वाटप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. एकाच वेळी शंभर महिलांना परमिट आणि नविन रिक्षा वाटप करण्याचा हा उपक्रम देशात पहिल्यांदाच होत असल्याची माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज (सोमवारी)पत्रकार परिषदेत दिली.

कामगार नेते बाबा कांबळे, संयोजिका आशा कांबळे, प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते. शहरातील काबाड कष्ट करणाऱ्या साफसफाई कामगार धुणी-भांडी, घरकाम, कागद-काच पत्रा वेचक आदी कामे करणा-या महिलांना  रिक्षाचे रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच त्यांचे आर.टी.ओ. कार्यालयामधून रिक्षाचे लायसन्स, बॅच आणि परमिट काढून देण्यात आले.

आता या शंभर महिला, भगिनी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभ्या राहतील आणि स्वाभिमानाने आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवतील. त्यांना टीव्हीएस कंपनीच्या रिक्षांची चावी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने त्या शंभर महिलांना संगणक किंवा 32 इंच टिव्ही भेट म्हणून देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.