Pimpri : महापालिकेच्या बस अभावी शेकडो विद्यार्थी होतील ‘शाळाबाह्य’

एमपीसी न्यूज – रावेत, पुनावळे, किवळे या ( Pimpri ) भागातील बांधकाम कामगार आणि मजुरांच्या मुलांना घरापासून अडीच ते तीन किलोमीटर दूर असलेल्या शाळांमध्ये जाता यावे यासाठी महापालिकेने मोफत बससेवा सुरु केली होती. कोरोना काळात ही बससेवा बंद झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मागील वर्ष वाया गेले आहे. यावर्षी बस सुरु झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येईल अन्यथा पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणारी ही मुले ‘शाळाबाह्य’ ठरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सहगामी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार यांनी महापालिका आयुक्तांसह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना बससेवा सुरु करण्याबाबत निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत जाण्यासाठी यावर्षी तरी बससेवा मिळेल का, असा प्रश्न रुद्रवार यांनी त्यांच्या निवेदनात उपस्थित केला आहे.

Chikhali : भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

रावेत, पुनावळे, किवळे भागातील बांधकाम कामगार, मजूर यांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर महापालीकेच्या शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांची पायपीट लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरु केली. ही बससेवा कोरोना साथीच्या काळात बंद झाली. कोरोनाची साथ गेल्यानंतर संपूर्ण जनजीवन सुरळीत झाले, मात्र बंद पडलेली बससेवा अद्याप सुरु झालेली नाही.

मागील वर्षी बससेवा सुरु न झाल्याने अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. लहान मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षात घेता अनेक पालक मुलांना एकट्याने चालत शाळेत लावायला धजावत नाहीत. बससेवा सुरु झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या, “मजुरी काम करणाऱ्या पालकांची त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची मानसिकता नसताना त्यांचे समुपदेशन करून मुलांच्या शिक्षणासाठी तयार केले जात आहे. मात्र महापालिकेकडून दिली जाणारी बससेवा बंद असल्याने ही मुले शिक्षणापासून पुन्हा वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेकडे पाठपुरावा केला असता बस सुरु करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत ( Pimpri ) आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.