Pimpri: सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे पाणी टंचाईच्या निषेधार्थ महापालिकेसमोर उपोषण

वाकड, पिंपळेनिलख परिसरातील दोन वर्षांपासून पाणी टंचाई

एमपीसी न्यूज – वाकड, पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ”काय उपयोग तुमच्या पैशांचा आणि सोन्याचा नाण्याच्या, जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा”….अशा मजकूराचा फलक उपोषणस्थळी लावण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वपक्षीय नगरसेवकाच्या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपची गोची झाली आहे.

महापालिकेच्या समोर सकाळपासून नगरसेवक कामठे यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांसह उपोषण सुरु केले आहे. कामठे म्हणाले, पिंपळेनिलख, विशालनगर, वाकड भागातील पाणीपुरवठा कायम विस्कळीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्याची सतत समस्या भेडसावत आहे. पिंपळे निलख, विशालनगर आणि वाकड हा भाग शहराच्या शेवटचे टोक आहे. या भागात सतत विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे.

पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पिंपळेनिलख परिसरात केवळ दहा ते वीस मिनिटे पाणी येते. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत असताना प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 19 निवेदने दिली. आंदोलन केले. तरी, देखील पाणीपुरवठा सुरळित होत नाही, असा आरोपही नगरसेवक कामठे यांनी केला. तसेच पिंपळेनिलख परिसरात पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा दिली. तरी, देखील पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची टाकी बांधली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.