Pimpri : पतीचे ‘एव्हरेस्ट’ स्वप्न पूर्ण पण पत्नीने घेतला एव्हरेस्टच्या कुशीत अखेरचा श्वास !

ट्राफिक जॅम मुळे एव्हरेस्ट बनतोय मृत्यूचा सापळा

एमपीसी न्यूज – माउंट एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जीवाचे रान करीत असतो. पण हे स्वप्न पूर्ण करताना अनेकदा त्याला आपले प्राण गमवावे लागतात. अशावेळी त्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे की त्याच्या निधनाचे दुःख व्यक्त करावे हेच कळेनासे होते. शरद आणि अंजली कुलकर्णी हे जोडपे निवृत्तीनंतर एव्हरेस्ट सर करण्यासाठी मोहिमेवर निघाले. शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केले पण पण अर्ध्या वाटेतच प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंजली यांचे मात्र निधन झाले. या दुर्दैवी घटनेने माउंट एव्हरेस्टवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

शरद कुलकर्णी हे जाहिरात क्षेत्रात काम करतात. आर एक्स कम्युनिकेशन नावाची त्यांची जाहिरात कंपनी आहे. शरद कुलकर्णी आणि त्यांची पत्नी अंजली यांना गिर्यारोहणाची आवड. व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर दोघांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा केला. त्या दृष्टीने तयारी म्हणून दोघांनी गिर्यारोहणाच्या अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून हे जोडपे एव्हरेस्ट मोहिमेवर रवाना झाले.

18 मे रोजी ते दोघे बेस कॅम्प पर्यंत पोचले. इथपर्यंत त्यांचा प्रवास सुखकर सुरु होता. आजपर्यंतच्या गिर्यारोहणाचा अनुभव असल्याने दोघांनाही विशेष त्रास जाणवला नाही. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी देश परदेशातून आलेल्या गिर्यारोहकांच्या प्रचंड गर्दीमुळे माउंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जॅम झाला होता.

बेस कॅम्प 2 वर ते 19 तारखेला पोचले. मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये साधारण शिखराच्या 10 मीटर पर्यंत शरद कुलकर्णी यांनी मजल मारली. मात्र पुढे झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे त्यांना पुढे जाणे अशक्य झाले. वर जाण्यासाठी ऑन त्यांना दोन तास लागणार होते. त्यांच्याजवळ असलेला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत चालला होता. त्यामुळे त्यांना सोबत असलेल्या शेर्पाच्या सूचनेनुसार परत माघारी फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शिखराच्या दिशेने एक नजर टाकून ते निराशेने मागे फिरले.

दुसरीकडे अंजली या 22 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साऊथ समिट या टप्प्यावर पोचल्या. म्हणजे या ठिकाहून अंतिम शिखर 100 मीटर उंचीवर होते. साऊथ समिट टप्प्यावर गिर्यारोहक काही वेळासाठी विश्रांती घेतात. त्यांच्याकडील ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन त्यांना दुसरे भरलेले सिलेंडर दिले जातात. याठिकाणी अंजली यांची प्रकारुती बिघडली. त्यांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागला. दरम्यान त्या ठिकाणी शरद कुलकर्णी पोचले. आपल्या पत्नीची गंभीर अवस्था पाहून त्यांचा धीर खचला. अंजली यांना त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता.

त्या अवस्थेतही त्यांनी आपल्याला कुशीत घेण्याची विनंती आपल्या पतीला केली. शरद कुलकर्णी यांनी जड अंतःकरणाने अंजलीला जवळ घेतले. पण परिस्थिती बिकट असल्यामुळे सोबतच्या शेर्पांनी शरद यांना खाली उतरण्याची सूचना केली. अंजली याना आम्ही खाली घेऊन येऊ असे सांगत शरद यांना त्यांनी खाली उतरण्यास भाग पडले. त्यानंतर काही शेर्पां अंजली यांच्या मदतीसाठी धावले. साऊथ समिट पासून त्यांना खाली आणण्यास सुरुवात केली पण वाटेत अंजली कुलकर्णी यांनी 22 तारखेला संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.

भारत सरकार आणि नेपाळ सरकारच्या प्रयत्नानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून अंजली यांचे पार्थिव ठाण्यात त्यांच्या घरी आणण्यात आले. शुक्रवारी (दि. 31) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एव्हरेस्ट सर करण्याचे शरद कुलकर्णी यांचे स्वप्न पूर्ण झाले. शरद कुलकर्णी हे शिखराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पोचल्यामुळे तांत्रिक दृष्टीने त्यांनी शिखर सर केले पण त्यांची प्रिय पत्नी अंजलीचे स्वप्न अधुरे राहिले. अंजली या ठाण्यामध्ये नामांकित गिर्यारोहक म्हणून ओळखल्या जात होत्या.

मागील काही वर्षांपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. त्यामुळे पुणे मुंबई शहरात भेडसावणाऱ्या ट्राफिक जॅम सारखी परिस्थिती या शिखराच्या वाटेवर निर्माण होत चालली आहे. या शिखरावर गिर्यारोहकांना काही मिनीटांसाठीच थांबता येऊ शकते त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे हे शिखर म्हणजे मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. यंदा जवळपास 311 गिर्यारोहकांना नेपाळ सरकारने परमिट दिले होते. त्यापैकी 11 गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माउंट एव्हरेस्टवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.