Pimpri: ‘मी पुन्हा येईन’; अजितदादांचा पिंपरी-चिंचवडकरांना वायदा!

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लक्ष घातले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करत चुकीच्या कामे होत असल्यास सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजप धार्जिणे असे आरोप असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करणार असल्याचे सांगितले. महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून नगरसेवकांना आक्रमक भूमिका घेण्याचा आदेश दिला. नगरसेवकांच्या मागणीनुसार एक किंवा द्विसदस्यीय (वार्ड) पद्धतीने महापालिकेची आगामी निवडणूक घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. तसेच आपणच पुण्याचा पालकमंत्री होणार असल्याचे संकेत देत पुन्हा येण्याचा वायदा दिला. अजितदादांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी भाजप, भाजपच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र, 2014 मध्ये विधानसभेला तीनही मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. लक्ष्मण जगताप भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. तर, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य झाले. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना देखील भाजपमध्ये नेले. एकेकाळच्या तीनही शिष्यांनी अजितदादांसमोर आव्हान निर्माण केले. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळ देत महापालिकेवरील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला.

महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीत मरगळ आली होती. शहराचा चेहरा मोहरा बदलूनही सत्ता गेल्याची खंत व्यक्त करत अजितदादांनी देखील शहराकडे पाठ फिरवली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पुत्र पार्थचा दारुण पराभव झाला. त्यामुळे त्यांनी शहराकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविलेले अण्णा बनसोडे पिंपरीतून निवडून आले.

राज्यातील राजकीय नाट्यमय घडामोडी संपवून महाविकास आघाडीचे सरकार आले. सरकार आल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच शहरात येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. दादांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जोरदार फटकेबाजी केली. महापालिकेतील भाजपच्या कारभारावर हल्ला चढविला. तसेच काळेबेरे सहन करणार नसून तक्रारींची चौकशी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मागील तीन वर्षे तो-यात असलेल्या आणि मनमानी पध्दतीने कारभार करणाऱ्या महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

महापालिकेला सक्षम आयुक्त दिला जाईल. प्रशासनातील मरगळ झटकली जाईल. मनमानीपणे कामकाज करणा-या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चौकशी होण्याची भीती त्यांना सतावत आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करून महापालिका कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाणी, अवैध बांधकामावरील शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच अनेकांनी अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याच्या वल्गना केल्या. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतली. पण, पाच वर्षे सत्ता असतानाही प्रश्न सोडविला नसल्याची टीका भाजप आमदारांवर केली.

सत्ता नसतानाही शहरात आल्यावर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर अजितदादा टीका करत होते. परंतु, राज्यात सत्तेत नसल्याने टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आता राज्यात सत्तेत आहेत. पुण्याचे पालकमंत्री आपणच होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे. नगरसेवकांना आक्रमक होण्याचे निर्देश दिले आहेत. चुकीच्या कामविरोधात आक्रमक भूमिका घ्या, आंदोलने करा असा आदेश त्यांनी दिला आहे. अजितदादांनी महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आतापासूनच लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.