Pimpri : बेकायदेशीर पार्किग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार का ? संतप्त नागरिकांचा सवाल

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी येथे सेंट्रल मॉलसमोर भर रस्त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. गजबजलेल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतूक कोंडीमध्ये भर घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या रहदारीच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरात वाहनतळांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे रहदारीवर ताण पडून वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडतात. पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर याठिकाणी असलेल्या मॉल्समध्ये अंतर्गत वाहन पार्किंग व्यवस्था असूनही काही ठिकाणी बाहेरील रस्त्यावर वाहने उभी केली जातात. पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी येथे सेंट्रल मॉलची अंतर्गत पार्किंग व्यवस्था असताना देखील येथे येणारे नागरिक बाहेर भर रस्त्यात आपली वाहने उभी करून वाहतूक कोंडीमध्ये भर घालताना दिसतात.

मॉलसमोरील असणारी वाहने व त्यात मेट्रोचे सुरु असलेले काम यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार नित्याचा झालेला आहे. येथून गाडी चालविणे दिवसेंदिवस कठीण होत असल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. पादचार्याना अक्षरशः जीव मुठीत घेऊन येथून जावे लागते. बेकायदेशीर पार्किंगवर पोलीस कारवाई कधी करणार ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

याबाबत वाहतुक विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा गायकर म्हणाल्या, “मॉलसमोरील असणा-या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई सुरु केली आहे. बेकायदा पार्किंग केल्यास त्या वाहनांवर जॅमर बसविण्यात येत आहे ” गेल्या तीन दिवसांमध्ये 50 वाहनांना जॅमर बसवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.