Pimpri : शहरात वृक्षांची बेकायदेशीर कत्तल सुरुच; थरमॅक्स चौकातील निलगीरीचे वृक्ष तोडले

पर्यावरणप्रेमींकडून संताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल केली जात आहे. बेकायदेशीर होत असलेल्या वृक्षांच्या कत्तलीमुळे शहराची हरितनगरी अशी असलेली ओळख पुसली जात आहे. वृक्षतोडीच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवून देखील बिनधास्तपणे तोड सुरुच आहे. रविवारी (दि.31)महापालिकेच्याच ठेकेदाराने चिंचवड, थरमॅक्स चौकातील निलगीरीचे मोठे झाड बुंध्यापासूनच तोडले आहे. या ठेकेदारावर आता फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे.

झाडाची छाटणी करण्याची परवानगी दिली असताना अनेकजण बुंध्यापासूनच झाड(वृक्ष) तोडतात. सर्रासपणे झाडांची कत्तल केली जात आहे. याकडे महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समिती गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे महापालिका पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर वृक्षप्रेमींनीकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.

चिंचवड, थॅरमॅक्स चौक येथे रस्त्यावर निलगीरीचे मोठे झाड होते. या झाडामुळे वाहतुकीला व कशालाही कोणतेही अडचण निर्माण होत नव्हती. तरीदेखील महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने ते झाड तोडण्यासाठी परवानगी दिली होती. त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हारकत घेतली होती. त्यानंतरही महापालिकेच्या झाकीर शेख या ठेकेदाराने निलगीरीच्या झाडाची कत्तल केली. महापालिकेने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. ”झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश देणारी महापालिका वृक्षांच्या बेकायदेशीर होणा-या कत्तलीकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच कोणताही अडथळा नसताना महापालिकेने झाड तोडण्यासाठी परवानगी कशी दिली होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थायी समितीचे सभापती व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ”झाड तोडलेल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. हरकत लेखी घेतली होती का? तोंडी घेतली होती? याची तपासणी केली जाईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल”

याबाबत बोलताना महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके म्हणाले, ”महापालिकेने चिंचवड, थॅरमॅक्स चौक येथील रस्त्यावरील निलगीरीचे झाड तोडण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काही नागरिकांनी हारकत घेतली. त्यामुळे ठेकेदाराला झाड तोडू नये असे सांगितले होते. तरी, देखील पूर्वीच्या महापालिकेचा ठेकेदार असलेल्या झाकीर शेख याने झाड तोडले आहे. त्यामुळे शेख याच्यावर गुन्हा दाखल केले जाणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.