Pimpri : महापालिकेने अनधिकृत पन्नास व्यावसायिक नळजोड तोडले

एमपीसी न्यूज – एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने (दि.25) पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिक नळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेच्या नळयोजनेतून व्यावसायिक वापरासाठी अनधिकृतरित्या पाणी घेतले जाते. हे व्यावसायिक महापालिकेचे पाणी फुकट वापरून त्यावर पैसे कमवतात. परंतु, त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. तसेच, रहिवाशी भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. त्यामुळे या पध्दतीने चोरून व्यावसायासाठी पाणी वापरणा-या आणि अनधिकृत नळजोड घेणा-या पन्नास व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून त्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात व्यावसायिक नळजोडांवर थेट कारवाई केली जाणार आहे. तर, रहिवाशी भागातील अनधिकृत नळजोड सापडल्यास जागेवरच ते अधिकृत केले जाणार आहेत. त्यांचे नावे अनामत रक्कम, दंड, विलंब शुल्काची रक्कम पाच हप्त्यांमध्ये टाकण्यात येऊन पाणीबील देण्यात येईल.

ऐकापेक्षा जास्त नळजोड असल्यास ते तोडून त्यांच्याकडून दंडाची वसूल करण्यात येणार आहे. त्याची देखील प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी खास सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई आणखी कडक केली जाईल, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.