Pimpri : औद्योगिकनगरीच्या सुरक्षेला बेकायदेशीर शस्त्रविक्रीचा फास

शहरात परराज्यातून मोठ्या प्रमाणात होतोय बेकायदेशीर शस्त्र पुरवठा

(श्रीपाद शिंदे)

दहा महिन्यात पकडल्या 50 बेकायदेशीर पिस्तूल

एमपीसी न्यूज – पिस्तूल जवळ बाळगणं काही जणांना प्रतिष्ठेचं वाटतं. काहींना सुरक्षित वाटतं, तर काहीजण केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीने पिस्तूल किंवा अन्य शस्त्रे जवळ बाळगतात. कायदेशीर परवानगी घेऊन शस्त्र खरेदी करणे कठीण प्रक्रिया असल्यामुळे थोडेफार पैसे मोजून बेकायदेशीर पिस्तूल मिळत असल्याने काहीजण त्याकडे आकर्षिले जातात. पिस्तूल जवळ बाळगण्याचा प्रवास आत्मसुरक्षेपासून सुरु होऊन तो गंभीर गुन्हेगारीपर्यंत जाऊन कधी पोहोचतो, हे वापरणाऱ्याला देखील कळत नाही. हा बेकायदेशीर शस्त्र पुरवठा आणि शस्त्र जवळ बाळगण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ही शस्त्रे प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश यांसारख्या ठिकाणाहून आणली जात आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर 2018 या दहा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात तब्बल 50 बेकायदेशीर पिस्तूले पकडण्यात आली आहेत. यामुळे या औद्योगिकनगरीच्या सुरक्षेला बेकायदेशीर शस्त्रविक्रीचा फास बसला आहे.

मध्यप्रदेश मधील मुरैना, भिंड, चंबळ परिसरात शस्त्र निर्मितीचे कारखाने आहेत. तसेच अधिकृत शस्त्र विक्रीची दुकाने (गन हाऊस) सुद्धा आहेत. या दुकानांमधून बेकायदेशीरपणे शस्त्र खाजगी वाहनांमधून सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून आणली जातात. जे लोक ही शस्त्र आणतात त्यांचा उद्देश प्रामुख्याने लवकरात लवकर जास्त पैसे मिळवणे असा असतो. पण ते ज्यांना शस्त्र विकतात त्यांच्यापासून शहरात अशांतता पसरू शकते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयात असताना पिंपरी-चिंचवड शहराला नेहमी दुय्यम स्थान दिले जायचे. सुरुवातीपासूनच इथल्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना म्हणावे तेवढे यश आले नाही. त्यामुळे औद्योगिक परिसरात सुरु झालेली गुन्हेगारी आयटी सेक्टरमध्ये देखील पसरली. किरकोळ कारणांवरून सुद्धा भांडणे होऊ लागली. यातून टोळ्या आणि टोळीयुद्धे तयार झाली. या प्रकारची गुन्हेगारी वाढविण्यासाठी बेकायदेशीर पिस्तुलांची गुन्हेगारांना मोठी मदत झाल्याचे चित्र आहे.

15 ऑगस्ट पासून पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले. अति वरिष्ठ अधिकारी शहरात बसू लागले. त्यामुळे त्या अधिका-यांची नजर शहरातल्या लहान-मोठ्या गुन्हेगारांवर राहू लागली. अजूनही आयुक्तालयाला मनुष्यबळासह अन्य गोष्टींची कमतरता आहे. पण मनुष्यबळ काही प्रमाणात का होईना पहिल्यापेक्षा वाढलं आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचा-यांचा काम करण्याचा उत्साह वाढत आहे. त्यामुळे कारवाया सफल होत आहेत. यातून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जात आहे.

एक बेकायदेशीर पिस्तूल 30 हजार ते 50 हजार रुपयांना मिळते. त्यामुळे पिस्तूल घेण्यासाठी कायदेशीर बाबींना बगल देत बेकायदेशीरपणाचा हा मार्ग लोकांना सोपा वाटतो. मागील दहा महिन्यात मध्यप्रदेश मधून आणलेल्या 14 पिस्तूल आणि 31 जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पकडली आहेत. 28 मार्च रोजी सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुंड अजय विलास काळभोर याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या आणि त्याचा मित्र दत्ता आगलावे या दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. अजय काळभोर याच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, गंभीर दुखापत, कट रचणे, वाहनांची तोडफोड करणे, गावठी कट्टे, पिस्टल बाळगणे असे एकूण 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर चॅप्टर केस, तडीपार व एमपीडीए ची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी मध्यप्रदेश मधून पिस्तूल आणले होते.

ऑगस्ट महिन्यात बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करणा-या अनुप नवनाथ सोनवणे आणि अवधुत जालिंदर गावढे या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 7 देशी बनावटीचे पिस्तूल व 15 जिवंत काडतूस असा एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा एवज जप्त केला. यांनी देखील ही शस्त्रे मध्य प्रदेश मधील उमरटी येथून आणली होती. अनुपचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तर अवधूत याची दोन हॉटेल आहेत. असे सुशिक्षित आणि व्यावसायिक तरुण सुद्धा या शस्त्र विक्रीच्या विळख्यात अडकत आहेत.

11 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेने केविन जॉर्ज अँथोनी या सराईत गुन्हेगाराला पिस्तूल विक्री करताना पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याने देखील पिस्तुले आणि काडतुसे मध्यप्रदेश मधून विक्रीसाठी आणली असल्याचे मान्य केले. केविन सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तीन शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

मोहन सुभाष कोळी (वय 21) आणि रामप्रसाद संतोष सोलंकी (वय 19) या दोन तरुणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 11 नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, 12 जिवंत काडतुसे जप्त केली. यांनी देखील मध्यप्रदेश मधूनच पिस्तूल पिंपरी-चिंचवड शहरात विक्री करण्यासाठी आणले होते. वरील सर्व घटनांचा विचार करता मध्यप्रदेश मधून बेकायदेशीर शस्त्र आणणे गुन्हेगारांना सोपं वाटत आहे. या घटनांमुळे मध्य प्रदेश मधील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तिथल्या स्थानिक सुरक्षा यंत्रणा एवढ्या गाफील कशा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही आकडेवारी केवळ पकडलेल्या पिस्तूल आणि काडतुसांची आहे. त्यामुळे शहरात शेकडो, हजारो बेकायदेशीर पिस्तूल असण्याची शक्यता आहे.

पिंपरी, चिंचवड, निगडी यासारख्या नागरी वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पिस्तूल विक्री करताना गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. शहरात बेकायदेशीर पिस्तूल आणणं आणि त्यांची विक्री होणं ही केवळ शोकांतिका नाही. तर कामगारनगरी म्हणून नावलौकिक असणा-या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना आहे. यामुळे इथल्या समाजव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. शस्त्र चालवून होणा-या गुन्हेगारीपेक्षा त्या शस्त्रांचा धाक दाखवून होणारी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काही काळात शहरात सर्व गुन्हे दाखल करून त्यांना उघड केले जात असल्याने ही आकडेवारी मोठी वाटत आहे. परंतु बेकायदेशीर शस्त्र विक्रीचं पाणी मागील कित्येक वर्षांपासून शहरात मुरत आहे. या मुरणा-या गुन्हेगारीच्या दूषित पाण्यावर कधी ठोस उपाय होणार याची संपूर्ण शहर वाट बघत आहे.

पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “पोलिसांना माहिती मिळत आहे. त्यानुसार कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय झाल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. आयुक्तालय झाल्यामुळे पोलीस प्रेझेन्स वाढला असून पोलिसांचे गुन्हेगारांवर सुपरव्हिजन वाढले आहे. बेकायदेशीर पिस्तूल विक्री तसेच अन्य प्रकारच्या कारवाया सध्या पोलीस करत आहेत. बेकायदेशीर शस्त्र विक्री आणि त्याचा पुरवठा याच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे”

जानेवारी ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पकडलेले पिस्तूल (कंसात काडतुसांची संख्या)

पिंपरी – 11 (00)
चिंचवड – 08 (16)
निगडी – 09 (16)
सांगवी – 02 (02)
वाकड – 03 (04)
हिंजवडी – 01 (00)
भोसरी – 06 (10)
एमआयडीसी भोसरी – 05 (17)
दिघी – 03 (06)
तळेगाव एमआयडीसी – 01 (00)
चिखली – 01 (02)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like