Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ अभियंत्यांची पुण्यातील ड्युटी तत्काळ रद्द करा – सीमा सावळे

Pimpri: Immediately cancel the duty of junior engineers from Pimpri-Chinchwad in Pune - Seema Sawale

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची ड्युटी म्हणजे एक प्रकारे द्रविडी प्राणायाम आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, अशा परिस्थितीत हा अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन प्रशासन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे. किमान पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ अभियंत्यापुरता तत्काळ हा आदेश मागे घेण्याची विनंती भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज, रविवारी (दि. 10) प्रत्यक्ष भेटून त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले.

नगरसेविका सावळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे पुणे शहरातील नियंत्रण हाताबाहेर गेले आहे. तिथे महापालिका प्रशासन त्यांच्या पध्दतीने जोमाने प्रयत्न करत आहे. पिंपरी चिंचवड मधील कनिष्ठ अभियंत्यांनी रोज पुणे शहरात जाऊन कोरोना नियंत्रणासाठी मदत करणे म्हणजे एक प्रकारचा द्रविडी प्राणायाम आहे. त्यांच्या रोजच्या ये-जा करण्यामुळे त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबालाही धोका संभवतो.

उलटपक्षी हेच कनिष्ठ अभियंते पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोरोनाचे वाहक ठरतील आणि जिथे परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे त्या पिंपरी-चिंचवडचे काम आणखी बिघडेल. त्यासाठी किमान पिंपरी- चिंचवड महापालिका सेवेतील कनिष्ठ अभियंत्याना लावलेली ड्युटी रद्द करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना करावी, असे सावळे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठा आणि ड्रेनेज दुरुस्ती देखभालीच्या तक्रारी सतत सुरू असतात. कोरोनाच्या आपत्तीमध्ये कनिष्ठ अभियंते ते काम अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत एकही तक्रार आलेली नाही. शहरात अगोदर कोरोनाच्या कामात व्यस्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा तिसरेच काम आणि तेही पुणे शहरात दिल्यास दैनंदिन पाणीपुरवठा, ड्रेनेजसह देखभाल दुरुस्तीच्या कामांवर परिणाम संभवतो, अशी भीती सावळे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.