Pimpri: ‘इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित निधी जमा करा’

Pimpri: 'Immediately deposit funds in indapur taluka flood affected farmers' accounts' शासनाने ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसहीत फॉर्म भरून घेतले. 

एमपीसी न्यूज- मागील वर्षाच्या अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर झाली. मात्र ही मदत अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झाली नसून हा मदतीचा निधी त्वरित यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी राज्य कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष महेश खडूस यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत असे म्हटले आहे की, मागील वर्षी अतिपावसामुळे भीमा नदीस पूर आला व इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती गटांतील विहीत जमिनी पाण्याखाली गेल्या. परिणामी ऊस, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

शासनाने ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसहीत फॉर्म भरून घेतले.

शासन निर्णयानुसार विविध पिकांची जमीन आकारानुसार मार्च 2020 मध्ये निधी किती वितरीत करावा याच्या याद्या सुद्धा जाहीर केल्या. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा झाला नसून शेतकरी चिंतेत आहेत.

भीमा नदीकाठी असलेले मौजे टणू व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निधी मार्च महिन्यातच वितरीत करण्यात आला. तरी उर्वरित शेतकऱ्यांना अजून निधी का जमा केला नाही असा प्रश्‍न राज्य पदवीधर संघाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

तेव्हा लवकरात लवकर उर्वरित शेतकऱ्यांचा निधी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा अशी मागणी राज्य पदवीधर संघाकडून करण्यात आले आहे.

पदवीधर कृषी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश बाबर, सचिव प्रकाश यादव व इंदापूर विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश मस्के यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.