Pimpri : बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हा, अन्यथा वेतन स्थगित, शिस्तभंगाची कारवाई

महापालिका आयुक्तांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या करुन पंधरा दिवस झाले तरी अनेक अभियंते बदली झालेल्या विभागात रुजू झाले नाहीत. त्यामुळे अभियंत्यांनी तत्काळ बदली झालेल्या विभागात रुजू व्हावे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच मार्च महिन्याचे वेतन स्थगित केले जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार केलेल्या बदल्याच्या धोरणानुसार महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांकडून बदल्यासाठी अर्ज मागविले होते. वर्ग एक ते चारमधील एकूण 120 कर्मचा-यांचे अर्ज प्रशासन विभागाला प्राप्त झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने 12 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी 47 अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता संवर्गातील 37 तर उपअभियंता संवर्गातील 10 अशा 47 अभियंत्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये अनेक अभियंत्यांची पुन्हा आपल्या विभागात बदली करुन घेतली. तर, अनेकांना ‘क्रिम’ विभागांत बदली करुन घेण्यात यश आले होते.

बदली झालेल्या या सर्व अभियंत्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. या बदलीच्याठिकाणी रुजू होण्यास नकार दिला अथवा बदली रद्द करण्यास राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, बदली होऊन पंधरा दिवस झाले तरी अनेक अभियंते बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक काढून अभियंत्यांनी तत्काळ बदली झालेल्या विभागात रुजू व्हावे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच मार्च महिन्याचे वेतन स्थगित केले जाईल, असा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.