Pimpri: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शहरात बारामती पॅटर्न राबवा -नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध परिसरासह रूपीनगर तळवडे मध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. आजपर्यंत शहरातील 115 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरात बारामती पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. निगडी-रुपीनगर परिसरातील रुग्णांचा आकडा 30 वर गेला आहे. यामुळे रुपीनगर हॉटस्पॉट झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकार तसेच महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

कर्फ्यू, लॉकडाऊन लागू झाल्यानंतरही कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वारंवार सांगूनही रूपीनगर मधील काही अतिउत्साही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रूपीनगरमध्ये बारामती पॅटर्न राबविणे गरजेचे आहे. या पॅटर्न नुसार ज्या भागात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. तिथे कर्फ्यू लावून सीमा सील कराव्यात. लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्यात यावे. या पध्दतीने उपाययोजना केल्यास शहरातील कोरोनाला वेळीच रोखण्यात यश येईल.

त्यामुळे शहरात ज्या – ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. तिथे प्रथम प्राधान्याने बारामती पॅटर्न अवलंबून कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात, अशी विनंती काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.