Pimpri: ‘जलद प्रतिसाद’ पथके कार्यान्वित करा – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाधिक जलद प्रतिसाद पथके तात्काळ कार्यान्वित करावेत, असा आदेश सभागृह नेते नामदेव ढाके यांनी प्रशासनाला दिला. तसेच महापालिकेने 9922501450 हा व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला असून, या नंबरवर संपर्क साधल्यास दोन तासात जलद प्रतिसाद पथक मदतीला पोहचले असेही त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा आणि यापुढे कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे लागेल याबाबत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची आज (बुधवारी) बैठक झाली. महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे बैठकीला उपस्थित होते.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात नेमके कोणकोणत्या भागात सर्वेक्षण, निर्जंतुकीकरण केले, फवारणी केली याची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके यांनी घेतली. जलद प्रतिसाद पथकांचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. सोसायटीमधील चेअरमन आणि इतर रहिवासी यांना विश्वासात घेऊन त्यांचीही मदत घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात असताना सामूहीक प्रयत्नांची गरज असते. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवून प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे. कोणत्याही स्वरूपाची आर्थिक गरज पडल्यास आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करून योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शहरात ज्याठिकाणी गर्दीचे कार्यक्रम होत आहेत ते तात्काळ बंद करण्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलावीत. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती तथा परिवाराला सोसायटीतील रहिवाशांनी सहकार्य करावे, अशा स्वरूपाचे पत्र महापालिकेने सोसायटी धारकांना द्यावे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण अतिदक्षता कक्ष कमी पडत असल्यास तात्काळ त्यांची उभारणी करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये तसेच घाबरून जाऊ नये, महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य विषयक सूचनांची अंमलबजावणी करावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही ढाके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.