Pimpri: पालिका वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार, कोरोनाशी लढताना सामान्य रुग्ण वाऱ्यावर

Pimpri: In Corona Crisis negligence of the Municipal Medical Department, a general patient facing medical problems सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यांना कोविड चाचणी करण्यास सांगितले जाते.

एमपीसी न्यूज- कोरोनाशी लढताना पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सर्वसामान्य रुग्णांना वा-यावर सोडल्याचे सध्या चित्र आहे. पालिकेने नॉन कोविड रुग्णांसाठी पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाशी केलेल्या करारनाम्याची मुदत संपून 15 दिवस उलटले. तरी, पालिकेने करारनाम्याचे नुतनीकरण करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना पैसे भरल्याशिवाय रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नाही. वैद्यकीय विभागाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोनाच्या महामारीतही वैद्यकीय विभागाकडून होत असलेल्या अशा कारभारामुळे करदात्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. पवन साळवे यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. 15 दिवसांपासून त्यांच्याकडे करारनाम्याचा प्रस्ताव पडून आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णासांठी वरदान ठरत असलेले वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित म्हणून घोषित केले. त्यापूर्वी या रुग्णालयात सर्व आजारावर मोफत उपचार केले जात होते. शहरातील मध्यमवर्गीय, झोपडपट्टीतील नागरिक उपचारासाठी वायसीएमला प्राधान्य देत होते.

वायसीएमची दिवसभराची ओपीडी जवळपास 1 हजार रुग्णांची होती. पण, वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित घोषित केल्याने आता तिथे केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहे.

नॉन कोविड रुग्णांसाठी पालिकेने वायसीएम लगतच्या डॉ.डी.वाय.पाटील या खासगी रुग्णालयाशी एका महिन्यासाठी करार केला होता. त्यानुसार नॉन कोविड रुग्णांसाठी 250 बेड उपलब्ध होते.

वायसीएम रुग्णालयातून चिठ्ठी घेऊन गेल्यानंतर डी.वाय. पाटील रुग्णालयात शहरातील सर्वसामान्य आजार असलेल्या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जात होते. त्यामुळे मध्यवर्गीय, झोपडपट्टीतील रुग्णांना दिलासा मिळत होता.

दरम्यान पालिकेचा करारनामा 30 जून रोजी संपला आहे. त्यांनतर वायसीएम रुग्णालय प्रशासनाने कराराला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाकडे पाठविला होता. पण, वैद्यकीय विभागाने 15 दिवस उलटून गेले तरी त्यावर अद्याप निर्णय घेतला नाही.

30 जूनपासून डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात पैसे घेतल्याशिवाय रुग्णाला दाखल करुन घेतले जात नाही. मोफत उपचार करण्यास नकार दिला जातो. पालिकेचा करारनामा संपल्याचे रुग्णांना रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाही.

सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यांना कोविड चाचणी करण्यास सांगितले जाते. त्यामुळे नॉन कोविड रूग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. सर्दी, ताप, डोके, पोट दुखीचे रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या रुग्णांना उपचारासाठी साधे पालिकेचे रुग्णालय देखील नाही. 25 लाख लोकसंख्येच्या शहरात सर्वसामान्य रुग्णांसाठी पालिकेचे रुग्णालय देखील उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित केले आहे. कोविडसाठीच्या खरेदीत गुंग असलेल्या वैद्यकीय विभागाने डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयासोबत 15 दिवस उलटूनही करारनामा करण्याची साधी ‘तसदी’ घेतली नाही.

वैद्यकीय विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे करदात्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोना लवकर संपणार नसल्याने वायसीएम रुग्णालयात नॉन कोविड रूग्णांवर लगेच उपचार करता येणार नाहीत. याची माहिती असल्याने करारनाम्याची मुदत संपताच त्याचे नूतनीकरण अथवा नव्याने करण्याची आवश्यकता होती.

चर्चा सुरु आहे..त्यानंतर करारनामा
पण, कोरोनाच्या महामारीत सुद्धा वैद्यकीय विभागाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. दरम्यान, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या काही मागण्या आहेत. त्यानुसार चर्चा सुरू आहे. त्यांनतर करारनामा करण्यात येईल असे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

 

करारनामा सुधारित करण्याबाबत चर्चा सुरु

”शहरातील नॉन कोविड रुग्णांसाठी पालिकेने डॉ. डी.वाय.पाटील या खासगी रुग्णालयाशी करार केला होता. त्याची मुदत 30 जून रोजी संपली आहे. त्याच्या मुदतवाढीबाबत चर्चा चालू आहे. अडचणी सोडवून त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांनी रुग्ण घेणे सुरु ठेवावेत असे निर्देश दिले जातील. काही दिवसात सुधारित करारनामा होईल”, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत सांगितले.

दरम्यान, वायसीएम आणि डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाचा करारनामा संपल्याने नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळत नाहीत. सध्या शहरात विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोविड व्यतिरिक्त इतर आजारावर उपचार मिळण्यासाठी तातडीने करारनामा वाढविण्यात यावा. अथवा नव्याने करावा, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.