Pimpri: चार दिवसात एक हजार रुग्ण वाढले, रुग्णसंख्या चार हजार पार

In four days the number of patients increased by one thousand, the number of patients exceeded four thousand : चार दिवसात एक हजार रुग्ण वाढले, रुग्णसंख्या चारहजार पार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील चार दिवसात तब्बल एक हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत 180 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 4004 झाली आहे. 10 मार्च ते 4 जुलै या 127 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे.

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. शहराला कोरोनाने अशरक्ष: विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज दोनशे, तीनशे जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. शहराला कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

परिणामी, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मार्च, एप्रिल, मे अर्धा या अडीच महिन्यात शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात होती. 10 मार्च ते 22 मे पर्यंत शहरातील रुग्ण संख्या 265 वर होती. त्यातच 22 मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले.

तेव्हापासून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. 30 जून रोजी रुग्णसंख्या तीन हजार होती. त्यानंतर 1 ते 4 जुलै या अवघ्या चार दिवसात तब्बल एक हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 4004 वर पोहोचली आहे. आज सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत तब्बल 180 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या चार हजाराच्या पुढे गेली आहे.

2388 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 1557 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली, तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 2388 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आजमितीला 1557 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 1244 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 52 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 21 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत शहरातील 59 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 1581 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयोगटातील नागरिकांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 1064 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयोगटातील 489 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 415 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 450 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.