Pimpri: अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलने) उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार अवैध वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणा-या 15 खासगी वाहनांवर खटले दाखल केले आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलचे समन्वयक संतोष माने यांनी दिली. तसेच ही धडक कारवाई यापुढे देखील वेगात सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. सहा सीटर, रिक्षामधून देखील बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. तीन प्रवाशांची क्षमता असताना जादा प्रवासी घेऊन धोकादायकपणे वाहतूक केली जाते. या खासगी वाहतुकीमुळे पीएमपीएमएलचे प्रवासी कमी होतात. त्याच्या परिणाम पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर देखील होतो. त्यामुळे खासगी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई सुरु केली आहे.

  • समन्वयक अधिकारी संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपीएमएलच्या दक्षता विभागाचे अशोक सोनवणे, कुंडलिक भापकर, बाबासाहेब बंडगर यांनी ही कारवाई सुरु केली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी देखील पीएमपीएमएलच्या कारवाईला सहकार्य केले आहे.

कारवाईसाठी दोन पोलीस अधिकारी दिले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने पीएमपीएमएलने अवैध प्रवासी वाहतूक करणा-या खासगी वाहनावर धडक कारवाई सुरु केली आहे.

  • पिंपरी चौक, नेहरुनगर, यमुनानगर, भोसरी स्पाईनरोड या परिसरात वाहनांवर कारवाई केली आहे. चार खासगी बस, एक मिनी बस, एक सहा सीटर आणि नऊ तीन सीटर अशा एकूण 15 खासगी वाहनांवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

वाहतूक पोलिसांनी या वाहनचालकांना नोटीस दिल्या असून त्यांच्यामार्फत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे, संतोष माने यांनी सांगितले. पुढील काळात ही कारवाई तीव्र केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.