Pimpri: महापालिका तिजोरीत पहिल्याच महिन्यात मालमत्ता करातून 30 कोटी रुपये

कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांचे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत सन 2019-2020 या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात मालमत्ता करातून 30 कोटी 46 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये ऑनलाईन भरणा करणा-यांची संख्या अधिक आहे. 30 जूनपर्यंत करदात्यांना सामान्य करात सवलत देण्यात येते. त्यामुळे कराचा भरुन करुन नागरिकांनी सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलांची रक्कम 30 जून 2019 पर्यंत आगाऊ भरणा-या मिळकतधारकांना सामान्य करात सवलत देण्यात येत आहे.

  • यामध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी राहत असलेल्या मिळकती, महिलांच्या नावे असलेल्या निवासी घरास, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असणा-या मिळकतीस, ग्रीन बिल्डिंग रेटिंग सिस्टिम राबविणा-या मिळकती, तर बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनींना सामान्यकरात सवलत देण्यात येत आहे. ऑनलाईन कराचा भरणा करणा-यांना देखील सवलत दिली जात आहे.

यावेळी डॉ. प्रवीण अष्टीकर म्हणाले, ”महापालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच 1 ते 30 एप्रिल 2019 दरम्यान सुमारे 30 कोटी 46 लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. 30 जूनपर्यंत सवलत योजना आहे. मिळकतधारकांना 16 करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची 8 क्षेत्रिय कार्यालये आणि www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी मिळकत कराचा भरणा करुन सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घ्यावा”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.