Pimpri: शहरात पहिल्या टप्प्यात उद्यापासून ‘या’ सात ठिकाणी मिळणार भाजीपाला 

शहरातील भोसरी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, वाकडमधील भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भाजीपाला, फळे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील 46 ठिकाणी भाजीपाला फळे व विक्री उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये  पहिल्या टप्प्यात उद्या (गुरुवार) पासून सात ठिकाणी भाजीपाला केंद्र सुरू होणार आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.  दरम्यान,   शहरातील भोसरी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, वाकडमधील भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहेत.

निगडी, प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास्थान, डी-मार्ट शेजारील मोकळा भूखंड रावेत, भोसरीतील गावजत्रा मैदान, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टएडियम, सीडीसी ग्राऊंड पूर्णानगर चिखली, सर्व्हे नंबर 628 वनदेवनगर थेरगाव आणि सांगवीतील पीडब्लूडी मैदान  या सात ठिकाणी उद्यापासून भाजीपाला मिळणार आहे. मोकळी जागा उपलब्ध झाल्यास उर्वरित ठिकाणी भाजीपाला, फळे खरेदी सुरू केली जाणार आहे.

सोशल डिस्टन्सिंग’साठी मंडईत नव्हे मोकळ्या पटांगणात भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना रांगेत आतमध्ये सोडले जाणार आहे. आतमध्ये जाण्या-येण्यासाठी वेगळे मार्ग असणार आहेत.  प्रत्येकाला सॅनिटायझर दिले जाणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंतच भाजीपाला विक्रीस परवानगी दिली आहे. नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे  पालन करायचे आहे. शारीरिक तापमान तपासण्यासाठी इन्फरेड थर्मल गणचा वापर करण्यात येणार आहे.

प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात मोकळ्या जागेत एक भाजीपाला केंद्र करण्यात येणार आहे.  टप्प्या-टप्प्याने केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तथापि, शहरातील महापालिकेच्या बंदिस्त असलेल्या भोसरी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, थेरगाव, वाकडमधील भाजी मंडई पुढील आदेशपर्यंत बंद असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.