Pimpri: तिस-या फेरीनंतरही आरटीईच्या 260 जागांकडे पालकांची पाठ

एमपीसी न्यूज – आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. शासनाच्या वतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. पिंपरी-चिंचवड विभागातून 3405 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून यापैकी 260 जागांवर प्रवेश न झाल्याने या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तर, 3136 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आरटीई प्रवेशपात्र असलेल्या 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड विभागामध्ये 176 शाळा होत्या. त्यामध्ये 3405 जागांसाठी पालकांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीमध्ये 3257 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. त्यामधील 2135 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला. दुस-या फेरीमध्ये लॉटरी लागलेल्या 1374 विद्यार्थ्यांपैकी 775 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर, तिस-या फेरीमध्ये 495 जणांची सोडत निघाली. त्यापैकी 226 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

तीन फे-यानंतर एकूण 3136 अनेक पालकांनी प्रवेश घेतले नसल्याने शिक्षण विभागाच्या वतीने मुदत वाढवून देण्यात आली होती. मुदतवाढ देऊनही 260 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

चौथी फेरी होणार का?

यंदा प्रथमच अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे शाळा आणि अर्जदाराचे घराचे ठिकाण याचे अंतर ठरविण्यात आले होते. त्यामुळे प्रक्रिया सुरळित होण्यास मदत झाली. तीनही फेºया पूर्ण झाल्या असल्याने शिल्लक जागांच्या प्रवेशासाठी चौथी फेरी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.